-
ऋजुता लुकतुके
Consumer Rights : हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणाचं बिल देताना अनेकदा खाद्यपदार्थांच्या किमतीव्यतिरिक्त पॅकेजिंग चार्जेसही आकारले जातात. पार्सल घेताना आकारले जाणारे हे काही रुपये आपण सहजपणे देतो. पण ग्राहकाकडून अशा प्रकारे अतिरिक्त पैसे घेणं योग्य आहे का? पश्चिम बंगालमधील (West Bengal) एका प्रकरणात ग्राहक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
कोलकात्यातील एका फूड आउटलेटला मोमोजच्या पॅकिंगसाठी ग्राहकाकडून १० रुपये अतिरिक्त आकारणं महागात पडलं आहे. पश्चिम बंगालच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने या प्रकरणात आउटलेटला ग्राहकाचे १० रुपये परत करण्याचे, १०० रुपये नुकसानभरपाई देण्याचे आणि २ हजार रुपये कायदेशीर खर्चापोटी देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय आयोगाच्या ग्राहक कायदेशीर मदत निधीत ५० हजार रुपये जमा करण्यासही सांगितलं आहे.
२९ ऑक्टोबर २०२४ रोजी एका ग्राहकाने कोलकात्यातील फूड आउटलेटमधून चिकन मोमोजच्या दोन प्लेट्स खरेदी केल्या. प्रत्येक प्लेटची किंमत १०९ रुपये होती. मात्र बिलामध्ये मोमोजच्या पॅकेजिंगसाठी अतिरिक्त १० रुपये आकारण्यात आले.
(हेही वाचा – नौदलाचा अभिमान! राष्ट्रपती Draupadi Murmu यांच्या उपस्थितीत केरळमध्ये पार पडली शानदार पासिंग आउट परेड)
ग्राहकाने या अतिरिक्त शुल्काला आक्षेप घेत पैसे परत मागितले. मात्र आउटलेटने पैसे परत करण्यास नकार दिला. त्यामुळे ग्राहकाने ग्राहक आयोगाकडे धाव घेतली.
आउटलेटने आयोगासमोर आपली बाजू मांडताना ग्राहक मोटारसायकलवरून प्रवास करणार असल्याने त्याने मोमोज सुरक्षित राहावेत आणि सांडू नयेत यासाठी अतिरिक्त पॅकिंग मागितलं होतं, असा दावा केला. या पॅकिंगसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काची माहिती आधीच दिली होती आणि ग्राहकाने त्याला संमतीही दिली होती, असं आउटलेटचं म्हणणं होतं.
मात्र ग्राहकाने पॅकिंगसाठी स्वतंत्रपणे विनंती केली होती किंवा अतिरिक्त शुल्क देण्यास संमती दिली होती, याचा कोणताही पुरावा आउटलेटला आयोगासमोर सादर करता आला नाही.
या प्रकरणात आयोगाने ‘सेल ऑफ गुड्स अॅक्ट, १९३०’ मधील कलम ३६(५) चा आधार घेतला. या तरतुदीनुसार, वेगळा करार झालेला नसेल तर विक्री केलेला माल ग्राहकाला देण्यायोग्य स्थितीत आणण्याचा खर्च विक्रेत्याने करायचा असतो.
आयोगाच्या मते, ग्राहकाने पार्सल घेऊन जाण्यासाठी खाद्यपदार्थांचं पॅकिंग करणं ही विक्रेत्याची जबाबदारी आहे. ग्राहकाने विशेष पॅकिंगची मागणी केली होती किंवा त्यासाठी अतिरिक्त पैसे देण्यास संमती दिली होती, हे सिद्ध न करता शुल्क आकारणं ही सेवेतील त्रुटी ठरते. या निर्णयातून ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. हॉटेल, रेस्टॉरंट किंवा फूड आउटलेटमध्ये बिल देताना केवळ एकूण रक्कम न पाहता त्यातील प्रत्येक शुल्क तपासणं आवश्यक आहे. पॅकेजिंग, सर्व्हिस किंवा इतर कोणत्याही नावाखाली अतिरिक्त पैसे आकारले असतील, तर त्याबाबत स्पष्टीकरण मागता येतं.
अशा प्रकारचा अन्याय झाल्यास बिल, पेमेंटची पावती आणि संबंधित संवादाचे पुरावे जतन करून ठेवणंही महत्त्वाचं आहे. गरज पडल्यास ग्राहक आयोगाकडे दाद मागता येते.
दहा रुपयांच्या शुल्कावरून सुरू झालेलं हे प्रकरण केवळ एका ग्राहकाच्या तक्रारीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ग्राहकांच्या हक्कांबाबत जागरूकता आणि व्यावसायिकांनी आकारलेल्या शुल्कातील पारदर्शकता किती महत्त्वाची आहे, याची आठवण या निर्णयाने करून दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

