
Maharashtra Sahitya Parishad President : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव २० विरुद्ध ० अशा एकमताने मंजूर झाला आहे. या निर्णयानंतर सुनील महाजन यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे परिषदेच्या नेतृत्वात मोठा बदल झाला असून साहित्य क्षेत्रात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.
अविश्वास ठरावाला सर्व सदस्यांचा पाठिंबा
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू होते. अध्यक्ष योगेश सोमण यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत २७ ऑक्टोबर रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. या ठरावावर २१ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती समोर आली होती. अखेर २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत २० विरुद्ध ० मतांनी हा ठराव मंजूर झाला.
नांदी संमेलनाच्या नियोजनावरून वाद
परिषदेतील या संघर्षाला नांदी संमेलनाच्या नियोजनावरून सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक शाखांना विश्वासात न घेणे, पदाधिकाऱ्यांशी समन्वयाचा अभाव, प्रशासकीय कामकाजातील कथित अनियमितता आणि आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याशिवाय कार्यकारी मंडळाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचे आरोपही अविश्वास ठरावाद्वारे करण्यात आले होते.
नव्या नेतृत्वाकडे परिषदेची धुरा
अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सुनील महाजन यांची अध्यक्षपदी, प्रा. राजन लाखे यांची प्रमुख कार्यवाहपदी, तर उन्मेष गायधने यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभारात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे.
आगामी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा बदल
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषदेत झालेला हा नेतृत्वबदल महत्त्वाचा मानला जात आहे. नव्या पदाधिकाऱ्यांसमोर परिषदेतील अंतर्गत मतभेद दूर करणे, शाखांशी समन्वय वाढवणे आणि साहित्यविषयक उपक्रमांना गती देण्याचे आव्हान असणार आहे. सुनील महाजन यांच्या नेतृत्वाखाली परिषदेचा कारभार कसा चालतो, याकडे आता संपूर्ण साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा –

