-
ऋजुता लुकतुके
Hockey India League : हॉकी इंडिया लीगचा २०२६-२७ हंगाम जानेवारी २०२७ च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. पुरुष आणि महिला स्पर्धांसाठी खेळाडूंचा लिलाव ७ डिसेंबरला नवी दिल्लीत (New Delhi) होईल, अशी घोषणा हॉकी इंडियाने केली आहे. आगामी हंगामात पुरुषांच्या स्पर्धेत सहा, तर महिलांच्या स्पर्धेत चार फ्रँचायझी सहभागी होतील.
लिलावापूर्वी (Hockey Auction) संघांना खेळाडूंच्या अदलाबदलीची आणि अंतिम संघयादीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. फ्रँचायझींनी प्रस्तावित खेळाडू-बदलांची माहिती २९ नोव्हेंबरपर्यंत परस्परांना द्यायची आहे. अधिकृत ट्रेडिंग विंडो २९ नोव्हेंबर दुपारी १२ वाजता सुरू होऊन २ डिसेंबर सकाळी १० वाजता बंद होईल. खेळाडूंची अंतिम यादी आणि कायमस्वरूपी मुक्त केलेल्या खेळाडूंची माहिती २ डिसेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत सादर करावी लागेल. त्याच दिवशी संकलित लिलाव यादी संघांना पाठवली जाईल. लिलावासाठी खेळाडूंची यादी कमी करण्याची अंतिम मुदत ३ डिसेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
(हेही वाचा – US Tariff Rates 2026 : अमेरिकेचा भारताला मोठा दिलासा! टॅरिफ २५% वरून थेट १७% होणार? पण ‘या’ अटी मान्य कराव्या लागणार!)
२०२६-२७ हंगामासाठी पुरुषांच्या प्रत्येक फ्रँचायझीची वेतनमर्यादा चार कोटी रुपये, तर महिलांच्या प्रत्येक संघाची मर्यादा दोन कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. लिलावातील खेळाडूंच्या मूळ किमती दोन, पाच आणि दहा लाख रुपये अशा तीन श्रेणींमध्ये असतील. रांची रॉयल्सच्या पुरुष संघातील तसेच हॉकी इंडिया लीगच्या गव्हर्निंग कौन्सिल संघातील खेळाडूंचाही लिलावाच्या यादीत समावेश होणार आहे. त्यामुळे संघांना उपलब्ध खेळाडूंच्या आधारे नव्याने संघरचना करण्याची संधी मिळेल.
भारतीय महिला संघाची कर्णधार सलीमा टेटे (Salima Tete) हिने लीगच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त केला. देशांतर्गत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याची आणि तरुण मुलींना हॉकीकडे आकर्षित करण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळते, असं तिने म्हटलं. पुरुष संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) यानेही जानेवारीत लीग सुरू होणार असल्याचं स्वागत केलं. जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव भारतीय खेळाडूंना आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल, असं त्याचं मत आहे.
लिलावाच्या तारखेसह हंगामाचं वेळापत्रक जाहीर झाल्याने आता फ्रँचायझींची संघबांधणी निर्णायक टप्प्यात प्रवेश करणार आहे. जानेवारीत सुरू होणाऱ्या स्पर्धेत नव्या संघरचना आणि भारतीय-विदेशी खेळाडूंच्या जोड्यांवर हॉकीप्रेमींचं लक्ष असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

