- विशेष प्रतिनिधी
नाशिक (Nashik) शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मात्र, ही नाराजी कोणत्याही व्यक्ती किंवा पदाबाबत नसून नागरिकांच्या मृत्यूबाबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.
भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या गंभीर बनली असून त्यामध्ये चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मात्र, याचा अर्थ कोणाला पालकमंत्री करण्याची मागणी किंवा कोणाला हटविण्याची भूमिका असा होत नाही. “मी फक्त खड्ड्यांच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असताना पर्यायी मार्गही सुरक्षित आणि सुस्थितीत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमेही ही परिस्थिती सातत्याने दाखवत असल्याचे नमूद करत, अपघात टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“माझी कोणाविषयी नाराजी नाही. माझी नाराजी केवळ नागरिकांच्या मृत्यूबाबत आहे. या परिस्थितीमुळे महापौर, नगरसेवक आणि सर्वसामान्य नागरिकही त्रस्त आहेत,” असेही भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
ओबीसी जनगणनेबाबत बोलताना त्यांनी, ही आमची जुनी मागणी असून दुसऱ्या टप्प्यात ती होणार असल्याचे सांगितले. विरोधक हा विषय सातत्याने उपस्थित करत असले तरी त्याला माझा विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – CJP च्या आंदोलकांमध्ये सराईत गुन्हेगारांना सोडणार नाही; केंद्र शासनाने Supreme Court मध्ये मांडली भूमिका)
राज्यातील काही नियुक्त्या रखडल्याबाबत विचारले असता, त्या का थांबल्या याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. एका नव्या कायद्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर, “मी तो कायदा पूर्णपणे वाचलेला नाही. त्यामुळे त्यावर सविस्तर मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. संबंधित बाबी न्यायालयातही जाऊ शकतात,” असे ते म्हणाले.
एका महिला लोकप्रतिनिधीच्या नाराजीबाबत विचारले असता, त्या असे का म्हणाल्या किंवा त्या का नाराज आहेत, याची मला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, “प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, भूमिका घेतल्यानंतर त्यापासून पळ काढणे योग्य नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
पालकमंत्रीपदाच्या चर्चेबाबत विचारले असता, शुभेच्छा देणारे अनेक असतात. काही जण नात्याने जवळचे असतात, तर काही राजकीय सहकारी असतात. मात्र, निर्णय होईपर्यंत शांत राहणेच योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. पाय धुण्याच्या राजकीय कार्यक्रमांबाबत प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. “ते कितपत योग्य आहे, यावर मी भाष्य करणार नाही,” असे ते म्हणाले.
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प (Nashik-Pune Railway Project) लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या कार्यशैलीबाबत विचारले असता, “देवेंद्र फडणवीस अत्यंत हुशार आहेत. त्यांची आकलनशक्ती उत्तम आहे आणि सध्याच्या काळातील ते सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत,” असे भुजबळ यांनी म्हटले.
रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत बोलताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची गरज व्यक्त केली. “पाऊस पडतो आणि उघडतोही. त्यामुळे खड्ड्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती करून त्यात डांबर भरले गेले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. मतदारसंघांतील राजकीय समीकरणांबाबत बोलताना, प्रत्येक भागाचे सामाजिक आणि राजकीय स्वरूप वेगळे असल्याने त्यानुसार परिस्थिती बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

