एआय वाईट नाही, पण विचारशून्य होऊ नका, सजग राहण्याचा सल्ला देत Tukaram Mundhe यांचे तरुणांना आवाहन

81
एआय वाईट नाही, पण विचारशून्य होऊ नका, सजग राहण्याचा सल्ला देत Tukaram Mundhe यांचे तरुणांना आवाहन
एआय वाईट नाही, पण विचारशून्य होऊ नका, सजग राहण्याचा सल्ला देत Tukaram Mundhe यांचे तरुणांना आवाहन

Tukaram Mundhe: ‘एआय’ (AI) मुळात वाईट नसून, आपण त्याचा वापर कशा प्रकारे करतो यावरच यशाचे गमक ठरते, असे स्पष्ट करत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तरुणांना सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारांची मोठी भेसळ केली जात असून एक प्रकारे विचारांचे युद्धच सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही गोंगाटाचा भाग न बनता किंवा विचारशून्य न होता, क्षणभर थांबून सारासार विचार करा आणि या प्रवाहाला योग्य व सकारात्मक दिशा द्या, असे महत्त्वपूर्ण आवाहन त्यांनी केले आहे.

स्मृतिशेष माधुकरराव तामगाडगे ट्रस्टतर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात तुकाराम मुंढे यांनी तरुणांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आयपीएस अधिकारी संदीप तामगाडगे होते. तसेच या प्रसंगी तामगाडगे ट्रस्टच्या अध्यक्षा कुसुम तामगाडगे, कस्टम विभागाचे आयुक्त उन्मेष वाघ, प्राप्तिकर विभागाचे आयुक्त धनंजय वंजारी, आरबीआयचे प्रादेशिक संचालक सचिन शेंडे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली व बुद्धिस्ट स्टडीज विभागाचे प्रमुख नीरज बोधी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – Hormuz New Route : होर्मूझमधील नवीन जलमार्गावर इराण-ओमान यांच्यात यशस्वी करार, असा असेल नवीन मार्ग

रील खरे असतेच असे नाही

तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले, तंत्रज्ञानामुळे काळ झपाट्याने बदलला आहे. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल. मात्र मोबाइलने आपल्याला वापरावे की आपण मोबाइलचा वापर करावा, हे ठरवावे लागेल. स्वतःची बुद्धी शाबूत ठेवा. ज्ञानापासून विवेकापर्यंतची पायरी चढण्याची गरज आहे. सोशल मीडियावर दिसते म्हणून रील खरे असतेच असे नाही. प्रश्न पडू द्या, त्याचा उगम कुठून झाला, याचा शोध घ्या, असा सल्ला मुंढे यांनी दिला आहे.

नवनवीन वाटा शोधा  

या कार्यक्रमात तरुणांना मार्गदर्शन करताना तुकाराम मुंढे यांनी केवळ पदवी मिळवण्यावर समाधान न मानता कौशल्य आत्मसात करण्याचा आणि जीवनभर नवनवीन गोष्टी शिकण्याची सवय लावण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला. तसेच यंत्रांचा वापर तारतम्याने न केल्यास आपण त्याच्या गुलामगिरीत जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला. याच अनुषंगाने इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. सिकलसेल आजाराबाबत समाजात जनजागृतीची नितांत गरज असून लग्नापूर्वी याबाबतच्या वैद्यकीय चाचण्या करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत संदीप तामगाडगे यांनी व्यक्त केले. तसेच, विद्यार्थी दशेमध्ये चांगले मित्र जोडणे गरजेचे असून, भविष्यात येणाऱ्या अडचणीच्या काळात हेच मित्र मदतीला धावून येतात, असा कानमंत्र उन्मेष वाघ यांनी दिला; तर आयुष्यात नेहमी नवनवीन वाटा शोधण्याची आपली तयारी ठेवावी, असा बहुमोल सल्ला नीरज बोधी यांनी दिला.

या कार्यक्रमादरम्यान ‘स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्ती’ आणि सिकलसेलग्रस्त मुलींना वैद्यकीय तसेच शैक्षणिक सहकार्य देण्यासाठी ‘अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती’चे वितरण करण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.