आयुक्तांच्या आसपास घुटमळतोय कोरोना

93

मुंबईतील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये स्वत:ला सुरक्षित ठेवून संपूर्ण मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या महापालिका आयुक्तांच्या आसपासच आता कोरोना घुटमळताना दिसत आहे. आयुक्तांचे उपायुक्त असलेल्या चंद्रशेखर चौरे यांना कोरोनाची बाधा झाली असून आयुक्तांनाही याची भीती निर्माण झाली. मागील दोन दिवसांपासून आयुक्तांना सर्दी असल्याची चर्चा असून गुरुवारी केवळ महत्वाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे आयोजित मिटींग अटेंड केल्यानंतर त्यांनी पुन्हा कार्यालय सोडले. मात्र आयुक्तांना कोणत्याही प्रकारे कोरोनाची बाधा झाल्याची कारणे पुढे आलेली नसून चौरे यांना झालेली कोरोनाची बाधा आणि शुक्रवारी होणारी वृक्ष प्राधिकरणाची बैठक पुढे ढकलल्याने आयुक्तांना न झालेल्या कोरोना बाधेची चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

मुंबईत १७ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर तत्कालीन आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांनी कोविडची परिस्थिती हाताळण्याचा योग्यप्रकारे प्रयत्न केल्यानंतर मे २०२० मध्ये त्यांची बदली करून त्या जागी इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय कामकाजाच्या अनुभवाच्या जोरावर चहल यांनी कार्यालयात बसूनच सर्व यंत्रणाला कामाला लावली. प्रत्यक्ष फिल्डवर जाण्याचे टाळत त्यांनी ज्या ज्या यंत्रणा आवश्यक आहेत, त्या उभारण्याचा प्रयत्न संबंधित खात्याचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, खातेप्रमुख तसेच विभागाचे सहायक आयुक्त यांच्याशी चर्चा करत केला. त्यामुळे पहिला व दुसऱ्या टप्प्यात महापालिकेला मुंबईतील कोरोनाचा आजार वेळीच नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे.

( हेही वाचा : तिकीट देता देता..कंडक्टरचा असाही मार्केटिंगचा फंडा… )

उपायुक्त पॉझिटिव्ह

मात्र, आता तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर आयुक्तांच्या कार्यालयातच कोरोनाने शिरकाव केला आहे. महापालिका आयुक्तांचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांची मंगळवारी चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सध्या चौरे हे वैद्यकीय उपचारासाठी सुट्टीवर आहेत. तर आयुक्तांनाही आता प्रचंड सर्दीचा त्रास होत होता. त्यातून थोडेसे बरे वाटल्याने एका अत्यंत तातडीच्या बैठकीसाठी ते महापालिका कार्यालयात उपस्थित राहून त्यांनी ऑनलाईनद्वारे या सभेत भाग घेतला. बैठकीनंतर त्यांनी कार्यालय सोडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शुक्रवारी होणारी वृक्ष प्राधिकरणाची बैठक आयुक्तांनी २१ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. आयुक्त हे वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष असून आपली तब्येत बरी नसल्यानेच ही सभा त्यांनी पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.