BMC Cooper Hospital : कुपर रुग्णालयात २७ वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, १३ जणांच्या वैद्यकीय चमूने तीन तास केली शस्त्रक्रिया

गर्भ आवरणाच्या समस्येमुळे सदर महिलेच्या व गर्भाच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता.

101
BMC Cooper Hospital : कुपर रुग्णालयात २७ वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, १३ जणांच्या वैद्यकीय चमूने तीन तास केली शस्त्रक्रिया
BMC Cooper Hospital : कुपर रुग्णालयात २७ वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, १३ जणांच्या वैद्यकीय चमूने तीन तास केली शस्त्रक्रिया

एका २७ वर्षीय महिलेवर अतिशय गुंतागुंतीची व तब्बल ३ तास चाललेली प्रसूती शस्त्रक्रिया यशस्वी करुन मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रूग्णालयाने गर्भवती महिलेसह बाळाला वाचवण्यात यश मिळवले आहे. गर्भ आवरणाच्या समस्येमुळे सदर महिलेच्या व गर्भाच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता. मात्र कूपर रुग्णालयाच्या वैद्यकीय टिमने प्रसूतिपूर्व देखरेख, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व प्रसूति पश्चात उपचार हे सर्व टप्पे यशस्वीपणे पार पाडून आई आणि बाळ दोघांचाही जीव वाचवला आहे. या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान सुमारे अडीच लीटर इतका रक्तस्राव झाला. एरवी अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेदरम्यान २० ते ३० बाटल्या रक्तपुरवठा करावा लागू शकतो. मात्र त्या तुलनेत या महिलेला रक्त, प्लाझ्मा व प्लेटलेटस् हे सर्व मिळून १४ बाटल्या इतकाच पुरवठा करावा लागला, आपले वैद्यकीय कौशल्य पणाला लावून डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

गर्भ आवरण वेगाने वाढून गर्भाशयाला चिकटल्याने गर्भवती महिलांना प्रसूतिदरम्यान अतिरक्तस्रावाचा धोका निर्माण होतो. तसेच प्रसंगी गर्भ व नाळ खालच्या बाजूस सरकून शरीरात गुंतागुंत निर्माण होते. अशावेळी गर्भवती व गर्भ या दोघांच्याही जीवावर बेतू शकते. अशा प्रकारची धोकादायक स्थिती निर्माण झालेली एक २७ वर्षीय महिला तीन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पोहोचली, मात्र त्या रुग्णालयांनी असमर्थता दर्शवल्यानंतर महानगरपालिकेच्या डॉ. रुस्तम नरजी कूपर रुग्णालयामध्ये मे महिन्यात ती दाखल झाली.

या महिलेची पूर्वी देखील दोन वेळा शस्त्रक्रियेद्वारे (सीझर) प्रसूति झाली असल्याने गर्भाशयाची नैसर्गिक रचना बिघडलेली होती. सुमारे आठवडाभर निरनिराळे वैद्यकीय परीक्षण केल्यानंतर आढळलेल्या निरीक्षणानुसार, महिलेच्या जीवाला स्पष्ट धोका दिसत असला तरी गर्भ धारणेनंतर २५ आठवड्यांचा कालावधी उलटल्याने गर्भपात करणे देखील शक्य नव्हते. कारण कायद्यानुसार विशिष्ट परिस्थितींमध्ये प्रसूतिनंतरच्या २४ आठवड्यापर्यंत गर्भपाताची परवानगी देण्यात येते. त्यानंतरच्या कालावधीसाठी माननीय न्यायालयाचे आदेश प्राप्त करावे लागतात. मात्र, या महिलेच्या बाबतीत तिच्या जीवाला निर्माण झालेली धोकादायक स्थिती पाहता गर्भपात करणे उचित ठरत नव्हते. त्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांच्या संमतीने कूपर रूग्णालयातच प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोवर तिला पूर्णपणे आरामाचा सल्ला देण्यात आला. तसेच वेळोवेळी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

गर्भधारणेला ३६ आठवडे उलटत असतानाच आत्यंतिक वेदना होऊ लागताच मध्यरात्री ही महिला कूपर रुग्णालयात दाखल झाली. तिची स्थिती पूर्वीपासून ज्ञात असल्याने रुग्णालयातीचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या निर्देशानुसार, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रिना वाणी, डॉ. रश्मी जलवी, भूलतज्ज्ञ डॉ. नैना दळवी व सहकाऱयांनी आवश्यक ती वैद्यकीय तजवीज तसेच रक्तसाठा आदी तयारी केलेली होती. एकूण ३ डॉक्टर्स, ३ भूलतज्ज्ञ व २ परिचारिका अशा अकरा जणांच्या पथकाने तब्बल ३ तास चाललेली ही जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करुन दाखवत महिलेचे आणि बाळाचेही प्राण वाचवले. तसेच त्यानंतर गर्भाशय देखील काढून टाकावे लागले. कारण, गर्भाशय न काढता शस्त्रक्रिया केली असती तर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन बाळ किंवा महिला अथवा दोघांचा मृत्यू ओढवू शकला असता.

(हेही वाचा – Sudhir More : शिवसेना माजी नगरसेवक सुधीर मोरे आत्महत्या प्रकरण; संशयित आरोपीची अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव)

प्रसूतिदरम्यान या महिलेने सुमारे २.६७० किलोग्रॅम वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म दिला. बाळाला आणि या महिलेला धोक्यातून बाहेर काढल्यानंतर ३ दिवस त्यांना अतिदक्षता उपचार कक्षांमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर पुढील १७ दिवस सामान्य कक्षामध्ये देखरेख करण्यात आली. एकूण वीस दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने दोघांना घरी सोडण्यात आले. साधारणतः एक हजार प्रसूतिमागे अशी एखादी अत्यंत धोकादायक ठरु शकणारी व जीवावर बेतू शकेल, अशी प्रसूति शस्त्रक्रिया आढळून येते. त्यामुळे सदर प्रसूती ही दुर्मिळ स्वरुपाची होती. महिला व बाळ या दोहोंचे प्राण वाचल्यानंतर भारावून गेलेल्या संबंधित कुटुंबाने कूपर रुग्णालयातील वैद्यकीय चमूचे आभार मानले. सदर महिलेच्या पतीने पत्र लिहून कूपर रुग्णालयाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. या महत्त्वाच्या वैद्यकीय कामगिरीबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या चमूचे कौतुक केले आहे. महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अधिकाधिक चांगल्या व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देखील आयुक्त चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी यानिमित्ताने दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.