National Teacher Award : महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

राष्ट्रपतीच्या हस्ते ७५ शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

232
National Teacher Award : महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
National Teacher Award : महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक मोबाईल ऍप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृष्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, युट्युब, आकाशवाणी, सॉफ्टवेयर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपुर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यासह वर‍िष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी, महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२३ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यामध्ये शालेय विभागात आंबेगाव पुणे येथील, जिल्हा परिषद शाळेच्या मृणाल नंदकिशोर गांजळे, उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय मुंबईतील केशव काशिनाथ सांगळे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात स्थित आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील, आयआयटी मुंबईतील डॉ. राघवन बी. सुनोज तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात मुंबईतील लोअर परेल येथील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या शिल्पनिेदशक स्वाती देशमुख या शिक्षकांचा समावेश आहे.

New Project 2023 09 05T202312.131

मृणाल गांजाळे

पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांना २०२३ या वर्षाचा शालेय विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teachers’ Award 2023) प्रदान करण्यात आला. भारतातून ५० शिक्षकांची तर महाराष्ट्रातून एका शिक्षिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना यापूर्वी २०१९ सालचा राष्ट्रीय आय. सी. टी. पुरस्कार व २०२२ सालचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

डॉ. राघवन बी सुनोज

प्रा. राघवन बी. सुनोज मूळचे तिरुवनंतपुरमचे आणि आयआयटी बॉम्बेचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांना अध्यापन आणि संशोधनासाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. रसायनशास्त्र मध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले असून २००१ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर कडून त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला आहे. वर्ष २०१२ पासून ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. वर्ष २०१९ च्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

प्रो. केशव सांगळे

प्रो. केशव सांगळे यांना उच्चशिक्षणातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील शैक्षणिक योगदान, संशोधन, शोधनिंबधन विद्यार्थी मार्गदर्शन, शैक्षणिक प्रशासन, पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्था, राज्य व राष्ट्रीयस्तरावर केलेली मदत, राज्य व देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षण केल्याबद्दल २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील

डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांना उच्चतर शिक्षणातील तंत्रज्ञान वापर, समाज उपयोगी संशोधन तसेच नाविन्यपूर्ण व विद्यार्थीभिमुख शिक्षण पध्दतीचा विकास व वापर यासाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वाती योगेश देशमुख हस्तकला (क्राफ्ट्स कौशल्य) प्रशिक्षक

अत्यंत समर्पित आणि कुशल संगणक कौशल्य प्रशिक्षणात उल्लेखनीय कारकीर्दीची दखल घेत स्वाती योगेश देशमुख यांना वर्ष २०२३ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांना २२ वर्षांच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अनुभवासह, विद्यार्थ्यांना संगणक-संबंधित विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा गौरव केला गेला. त्यांनी आजतागायत ५०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण आणि मदत करून सर्वसमावेशकता आणि समर्पण दर्शविले आहे.

कठोर आणि पारदर्शक निवड प्रक्रियेव्दारे निवडलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी दरवर्षी शिक्षक दिन म्हणून राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम संपूर्ण भारतात आयोजित केला जातो. देशातील शिक्षकांच्या अव्दितीय योगदानाचा गौरव करणे व ज्या शिक्षकांनी आपल्या निष्ठेने आणि समिर्पित वृत्तीने केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही, तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द केले आहे, त्यांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारचा उद्देश आहे.

या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी ५० शालेय शिक्षक, उच्च शिक्षण विभागातील १३ शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या १२ शिक्षकांचा या पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, ५०,००० रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

New Project 2023 09 05T202254.779

पुरस्कार विजेत्यांबाबतची माहिती –
मृणाल गांजाळे

मृणाल गांजाळे-शिंदे यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्चुअल प्रकारे शिक्षणाचे आदान-प्रदान, गेमी फिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, AR-VR चा वापर, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाइट मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोविड काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अत्याधुनिक शिक्षण दिले. त्यांचे सन २०१९-२०२० या वर्षात इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्तीधारक १७ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थी नवोदय २ विद्यालयासाठी निवड पात्र ठरले. पंतप्रधान विद्या वाहिनीवर शिक्षकांसाठी मार्गदर्शन पर सेशनमध्ये CIET-NCERT मार्फत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले मागील वर्षी मायक्रोसॉफ्ट ceo सत्या नडेला यांनी देखील दिल्ली येथे त्यांच्या शैक्षणिक कामाचे कौतुक करून सन्मान केला. राष्ट्रीय आय. सी. टी मेला मध्ये देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे.

डॉ. राघवन सुनोज

डॉ. सुनोज यांनी सेंट जोसेफ स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असून, युनिव्हर्सिटी कॉलेज, तिरुवनंतपुरममध्ये शिक्षण घेतले आहे. डॉ. सुनोजने बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून पीएचडी प्राप्त केली. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन केल्यानंतर, ते वयाच्या २९ व्या वर्षी आयआयटी बॉम्बेमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले. डॉ. सुनोज यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CISR) २०१९ मध्ये प्रतिष्ठित ‘शांती स्वरूप भटनागर विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार’ प्रदान केले आहे.

प्रो. केशव सांगळे

प्रो. सांगळे हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे संरचना अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख आणि संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका शासकीय तंत्रनिकेतन पुणे, पदवी व पदव्युतर पदवी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे घेतली. त्यांनतर त्यांनी पीएचडी ही पूर्ण केली.

(हेही वाचा – BMC Cooper Hospital : कुपर रुग्णालयात २७ वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, १३ जणांच्या वैद्यकीय चमूने तीन तास केली शस्त्रक्रिया)

डॉ. चंद्रगौडा पाटील

डॉ. पाटील हे विद्यार्थ्यांना स्वत:च्या गतीने क्लिष्ठ विषयाचे अवलोकन करता यावे यासाठी मागील दोन दशकांपासून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण उपकरणे, शैक्षणिक साहित्य व शिक्षण पध्दती विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. डॉ. पाटील यांनी विकसित केलेले एक्स-कोलॉजि व कॅलफार्म नामक परस्पसंवादी सॉफ्टवेअर औषधनिर्माण, वैद्यकीय, पॅरामेडिकल व पशुवैदकीय क्षेत्रात अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांना वरदान ठरले आहे. या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे शैक्षणिक उद्ष्टीसाठी केल्या जाणाऱ्या विच्छेदनाला आळा बसून देशातील हजारो प्राण्यांचे जीव वाचले आहेत. यापूर्वी डॉ.पाटील यांना होमीओपॅथी क्षेत्रातील संशोधन कार्याबद्दल भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून देण्यात येणारा एक लाख रुपयांचा युवा वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झालेले असून डॉ. पाटील यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

स्वाती देशमुख

स्वाती देशमुख यांनी ४ सप्टेंबर २०१० पासून मुंबईतील सरकारी ITI लोअर परेल येथे संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग (COPA)असिस्टंट ट्रेडच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी संस्थेची वेबसाइट विकसित करून, शैक्षणिक युट्युब व्हिडिओ तयार करून आणि संगणक-आधारित प्रशिक्षण (CBT) मॉड्यूल डिझाइन करून त्यांच्या संस्थेच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याव्यतिरिक्त, प्रशिक्षणार्थींसाठी एक ई-लायब्ररी स्थापन केली आहे, डिजिटल शिक्षण संसाधनांचा प्रचार केला आहे. देशमुख यांनी संस्थेमध्ये हाय-टेक, इंटरनेट-सक्षम कॉम्प्युटर लॅबची स्थापना करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने उपलब्ध करण्यात तसेच विविध सक्षम विद्यार्थ्यांचे सक्षमीकरणात व रोजगार सुरक्षित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.