BEST : ‘बेस्ट’चा पास महागला; पासधारकांच्या खिशाला बसणार कात्री

बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात १० रुपयांनी, तर मासिक पासच्या दरात १५० रुपयांनी वाढ करण्यात आली.

141

मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या बेस्ट (BEST) बसचा दैनंदिन आणि मासिक पासच्या दरात वाढ करण्यात आली असून बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयामुळे पासधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात १० रुपयांनी, तर मासिक पासच्या दरात १५० रुपयांनी वाढ करण्यात आली असून ही दरवाढ १ मार्चपासून लागू होणार आहे.

दैनंदिन पास सुविधाही उपलब्ध केली

करोनाकाळात घसरलेली बेस्टची (BEST) प्रवासी संख्या पूर्ववत झाली असून बेस्टच्या बसगाड्या पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केलेल्या वातानुकूलित बसगाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्टने प्रवाशांच्या सुविधेसाठी मासिक पाससोबत दैनंदिन पास सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यालाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्टच्या दैनंदिन आणि मासिक पासधारकांची संध्या १ लाख ४० हजार ९६५ इतकी आहे. सुट्ट्या पैशांची समस्या सुटावी, दैनंदिन रोखीच्या व्यवहारातील असुरक्षितता दूर व्हावी, बेस्ट उपक्रमाच्या  (BEST) बस योजनेचा लाभ घेणे सोयीचे व्हावे, बेस्ट उपक्रमाचे उत्पन्न वाढावे यासाठी बेस्ट उपक्रमाने दैनंदिन आणि मासिक पासच्या दरपत्रकात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित योजनेनुसार ६ रुपये, १३ रुपये, १९ रुपये आणि २५ रुपयांपर्यंतच्या विद्यमान वातानुकूलित व विनावातानुकूलित प्रवास भाड्याच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरुपात बसपास उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच अमर्याद बसप्रवासासाठी दैनंदिन पास ५० वरून ६० रूपये, तर मासिक पास ७५० रुपयांवरून ९०० रूपये करण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.