Kalyan : स्वप्नांना मिळणार पंखांची जोड! आविष्कारतर्फे ५० वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

90
Kalyan : स्वप्नांना मिळणार पंखांची जोड! आविष्कारतर्फे ५० वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
Kalyan : स्वप्नांना मिळणार पंखांची जोड! आविष्कारतर्फे ५० वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
  • कल्याण : प्रतिनिधी

शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही मुलाचे स्वप्न अर्धवट राहू नये, या पवित्र हेतूने अविष्कार एज्युकेअर फाऊंडेशनने एक हात मदतीचा…एक हात जाणिवांचा, या संकल्पनेतून आज पुन्हा एकदा समाजापुढे आदर्श ठेवला. गरजू, वंचित, आदिवासी आणि अनाथ ५० विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम कल्याणातील (Kalyan) आंबेडकर चौकात असलेल्या शिशुविकास विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या पुण्यकार्यात अनिल आणि सरोज शर्मा या दानशूर दाम्पत्याने १० विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शैक्षणिक किट देणगी (Education Donation) स्वरूपात दिले. त्यांच्या या सहकार्यामुळे अनेक पालकांचा भार हलका झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सचिन जाधव, सचिव विनोद शेलकर, कोषाध्यक्ष गिरीश मंजुळे, सल्लागार प्रभाकर माळी, संचालक दलजीत बोन्स, वैशाली मंजुळे, प्रांजल बाविस्कर, अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण कांगणे, उद्योगपती जय वासा, माजी मुख्याध्यापक रत्नाकर, बिरारी आणि महेश कोटकर यांच्यासह शिक्षकवृंद व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(हेही वाचा – ODI World Cup 2027 : एकदिवसीय विश्वचषकासाठी ‘या’ खेळाडूचा विचार करण्याची निवड समिती, बीबीसीआयकडे माजी खेळाडूंची मागणी)

आजही अनेक कुटुंबांसाठी वह्या, पुस्तके, गणवेश, दप्तर किंवा पावसाळ्यातील रेनकोट यांसारख्या मूलभूत गरजा देखील स्वप्नवत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये आणि त्यांना देखील इतर मुलांप्रमाणे आत्मविश्वासाने शाळेत जाता यावे यासाठी अविष्कार एज्युकेअर फाऊंडेशन (Aviskar Educare Foundation) गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे.

या उपक्रमात ५० विद्यार्थ्यांना नवीन शाळेचा गणवेश, स्कूल बॅग, २०० पानांच्या सहा वह्या, कंपास बॉक्स, पेन, पेन्सिल, स्केल, खोडरबर, रेनकोट तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. साहित्य मिळताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि डोळ्यातील आत्मविश्वास पाहून उपस्थित प्रत्येकाचे मन भरून आले. विद्यार्थ्यांचा तो आनंदच या सामाजिक कार्याची खरी पावती ठरला.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहून मेहनतीने शिक्षण घेऊन समाजाचे नाव उज्ज्वल करण्याचा संदेश दिला. तसेच समाजातील सर्वांनी अशा उपक्रमांना हातभार लावावा, असे आवाहन केले. आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशन यापुढेही शिक्षण आणि माणुसकीची भावना जोपासत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण पेरण्याचे काम करत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.