मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Ahmedabad Highway) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी एका दुर्दैवी घटनेमुळे. पालघर जिल्ह्यातील एका महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्यामुळे आपला जीव गमवावा लागला. वाहतूक कोंडीमुळे (Traffic Jam) रुग्णवाहिका तब्बल ३ तास एकाच जागी अडकून पडली होती. या महामार्गावरील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. (Mumbai-Ahmedabad highway)
(हेही वाचा – परदेशी पर्यटकांची Mumbai मध्ये फसवणूक; ४०० मीटरच्या प्रवासासाठी मागितले साडेतीन हजार डॉलर्स)
भीषण अपघात आणि उपचारासाठी धावपळ
पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या ४९ वर्षीय छाया पुरव आपल्या घराजवळ असताना त्यांच्या डोक्यावर झाडाची फांदी पडली. ३१ जुलै रोजी घडलेल्या या दुर्घटनेत छाया यांच्या डोक्याला, खांद्याला आणि मणक्याला जबर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारांची गरज होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता त्यांना रुग्णवाहिकेतून मुंबईकडे घेऊन जाण्यास सुरुवात झाली. मात्र, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्यांची रुग्णवाहिका जागच्या जागीच अडकून पडली.
३ तासांची कोंडी आणि उपचारांचा अभाव
रुग्णवाहिका मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आल्यानंतर वाहतूक कोंडीत अडकली. ३ वाजता निघालेली रुग्णवाहिका सायंकाळी ६ वाजेपर्यंत फक्त अर्धे अंतर पार करू शकली. या तीन तासांच्या काळात त्यांची प्रकृती अधिकच खालावत चालली होती. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात पोहोचणे अशक्य असल्यामुळे त्यांना मीरा रोड येथील ऑर्बिट रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑर्बिट रुग्णालय हिंदुजा रुग्णालयापासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर होते. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
(हेही वाचा – Nashik Kumbh Festival : ५१४० कोटींच्या महायोजनेला मंजुरी; नेमकी कोणती कामे होणार?)
महामार्गाच्या दुर्दशेचा वारंवार बळी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची (Traffic Jam) समस्या आता जीवघेणी बनली आहे. यापूर्वीही अनेक अपघात आणि घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम, रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यांमुळे महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तात्काळ उपाययोजना न केल्यास अशा घटना वारंवार घडत राहतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

