Ajit Pawar : पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नामंतर ‘राजगड’ करा; अजित पवारांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्याबाबत सकारात्मक ठराव झाला आहे.

138
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल २७ वर्षे स्वराज्याचा कारभार राजगडावरून चालवला. किल्ले राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी, स्वराज्य स्थापनेतील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. राजगडाचे ऐतिहासिक महत्व, वेल्हे आणि महाराष्ट्रवासियांच्या मनातले राजगडाबद्दलचे आदराचे स्थान लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर ‘राजगड’ करण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar यांनी मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पवार यांनी यासंदर्भात महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिले असून, वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्याबाबत सकारात्मक ठराव झाला आहे. त्यावेळी वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींनी, तालुक्याचे नामांतर राजगड करण्याचे ठराव सादर केले होते.  किल्ले राजगडाबद्दल वेल्हे तालुकावासियांच्या, तमाम महाराष्ट्रवासियांच्या मनात असलेली आदर, अभिमानाची भावना लक्षात घेऊन वेल्हे तालुक्याचे नामांतर तातडीने करण्यात यावे, असे पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मागणी काय?

वेल्हे तालुका हा शिवकालीन व ऐतिहासिक वारसा असलेला आणि किल्ले मालिकेतील किल्ले राजगड व किल्ले तोरणा असे दोन महत्वपूर्ण किल्ले समाविष्ट असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्त पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती. तथापी, सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असलेने तालुक्याचे नाव वेल्हे असे नमूद आहे. वेल्हे तालुक्यातील तमाम नागरिकांच्या भावना या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी या तालुक्यामध्ये स्थित असल्याने किल्ले राजगड वरुन या तालुक्याचे नामकरण ”राजगड” करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, असे अजित पवार Ajit Pawar यांनी राज्य शासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.