विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचा काय आहे प्लॅन?

महाविकास आघाडीकडे सध्या 171 इतके संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 संख्याबळ आहे. त्याचमुळे उद्या भाजप काय रणनीती आखणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

80

राज्याचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होत असून, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून आता संग्राम थोपटे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, भाजप या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघत आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपने देखील जर विधानसभा अध्यक्ष निवडणूक लागली, तर आपला उमेदवार कोण असेल याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे.

भाजपकडून किसन कथोरे यांचे नाव चर्चेत

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपकडून किसन कथोरे यांच्या नावाची चर्चा सुरु असून, ते पुन्हा एकदा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 2019मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ते काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या विरोधात उभे होते. भाजपने त्यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे केले होते. 2019 ला ते मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गोटीराम पवार उभे होते. यावेळी गोटीराम पवार यांचा त्यांनी 26 हजार 230 मतांनी पराभव केला होता. कथोरे हे 2014मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आले होते. ते मुरबाडचे आमदार आहेत. भाजपच्या तिकिटावर ते 2014 आणि 2019मध्ये निवडून आले आहेत. ते 2004मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर अंबरनाथमधून निवडून आले होते. 2009मध्येही ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर मुरबाड मतदारसंघातून ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

(हेही वाचा : काँग्रेसला मुंबईत डबल सीट शिवाय पर्याय नाही!)

उद्या भाजपच्या सर्व आमदारांची बैठक

सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपने रविवारी वसंत स्मृती येथे आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली असून, या बैठकीत दोन दिवसांच्या अधिवेशनाची रणणीती तसेच विधान सभा अध्यक्ष निवडणुकीची व्यूहरचना देखील आखली जाणार आहे. सध्या विधानसभेतील संख्याबळ महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीकडे सध्या 171 इतके संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 संख्याबळ आहे. त्याचमुळे उद्या भाजप काय रणनीती आखणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.