Congress : सांगलीत उबाठा उमेदवार माघार घेणार की काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढणार? विश्वजित कदमांच्या दिल्लीवारीने चर्चेला उधाण 

100

एका बाजूला उबाठा गटाने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि दुसरीकडे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली. काँग्रेसचे (Congress) सर्वच ज्येष्ठ नेते यावरून नाराज झाले. सांगलीतील उमेदवारीसाठी आग्रही असलेले काँग्रेसचे विशाल पाटील यांनी विश्वजित कदम यांच्यासह थेट दिल्लीच गाठली. ही जागा काँग्रेसची आहे आणि इथून काँग्रेसचं लढणार, हे पटवण्यासाठी कदम काँग्रेसच्या हायकमांडला विश्वासात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे सांगलीतून उबाठा त्यांचा उमेदवार चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेणार की काँग्रेससोबत उबाठा सांगलीत मैत्रीपूर्ण लढणार, यावर चर्चेला उधाण आले आहे.

(हेही वाचा MNS : मनसेची महायुतीशी चर्चा सुरूच; चर्चा फिस्कटली तर राज ठाकरेंचा काय आहे प्लॅन बी?)

कदमांनी हायकमांडला घेतले विश्वासात 

सांगली जिल्ह्यातील काँग्रेस (Congress) नेते विश्वजीत कदम यांच्यासह पक्षाचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि कोणत्याही स्थितीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसने ही जागा सोडू नये, अशी या नेत्यांची आग्रही मागणी आहे. विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस के.सी.  वेणूगोपाल आणि मुकूल वासनिक यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना विश्वजीत कदम यांनी आक्रमक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. मी माझ्या भावना आमचे नेते राहुल गांधी यांच्यापर्यंतही पोहोचवणार आहे. मी यापूर्वी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आमची भूमिका मांडली होती. हे पत्र मी मल्लिकार्जुन खरगे यांनाही दिले. सांगली लोकसभा मतदारसंघ आम्हाला हवा आहे आणि तो लढण्यास आम्ही सक्षम आहोत. आम्हाला विश्वास आहे की, महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस (Congress) हा मतदारसंघ आपल्याकडे घेईल. अन्यथा जर या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत काँग्रेस पक्षाला करायची असेल तर आम्ही त्यालाही तयार आहोत, असे विश्वजीत कदम यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आव्हान दिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.