MNS : मनसेची महायुतीशी चर्चा सुरूच; चर्चा फिस्कटली तर राज ठाकरेंचा काय आहे प्लॅन बी?

201
महायुतीमधील जागा वाटपाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यानंतर मनसेचा (MNS) महायुतीतील सहभाग निश्चित झाल्यास या पत्रकार परिषदेला राज ठाकरे उपस्थिती लावू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महायुतीत सहभागी होण्यासंदर्भात मनसे नेत्यांची एक महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी झाली. महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा होताना, मनसेने महायुतीकडे ३ जागांची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक चर्चा सुरू होती. आता मात्र दोन जागांवर चर्चा सुरू आहे. मात्र चर्चा फिस्कटली तर राज ठाकरे यांनी प्लॅन बी तयार केला आहे.

तर्क-वितर्कांना उधाण 

९ एप्रिल रोजी असणाऱ्या गुढी पाडवा मेळाव्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. महायुतीसोबत सुरू असलेली जागा वाटपाविषयीची चर्चा फिस्कटली किंवा महायुतीसोबत जायचा निर्णय अंतिम झाला नाही, तर मनसे (MNS) यंदाची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार का, असा प्रश्न मनसे नेते बाळा नांदगावकर यांना विचारण्यात आला. आम्ही यापूर्वीही लोकसभा निवडणुका लढल्या आहेत. मी स्वतःदेखील लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे यावर पक्षप्रमुख राज ठाकरे निर्णय घेतील, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपासून मनसे (MNS) आणि शिवसेना शिंदे गटाचे विलिनीकरण होऊन राज ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख होऊ शकतात, अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यावरून काही तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यासंदर्भात बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना बाळा नांदगावकर म्हणाले की, या केवळ चर्चा आहेत. याची आम्हाला कोणतीही कल्पना नाही. जर असे घडणार असेल, तर त्या त्या प्रमुखांना त्याची कल्पना असेल. अशा गोष्टी आमच्यापर्यंत येतील, तेव्हा जाहीरपणे सांगितल्या जातील, याची आपण खात्री बाळगा, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.