-
प्रतिनिधी
Tukaram Mundhe प्रशासकीय वर्तुळात आपल्या प्रामाणिकपणाचा आणि शिस्तीचा ‘हॅमर’ चालवणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांच्या कारकिर्दीतील २४ वी बदली आज अखेर झालीच. खुद्द मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात ज्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले होते, त्या तुकाराम मुंढे यांना अचानक दिव्यांग कल्याण विभागातून हलवून मदत व पुनर्वसन (आपत्ती व्यवस्थापन) विभागात पाठवण्यात आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (Tukaram Mundhe)
खोट्या प्रमाणपत्रांचे रॅकेट आले होते रडारवर
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांग कल्याण विभागात रुजू झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. विशेषतः ‘दिव्यांग’ असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याची मोठी मोहीम त्यांनी हाती घेतली होती. या मोहिमेमुळे प्रशासनातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. हे रॅकेट उघड झाले असते तर अनेक ‘पांढरपेशा’ चेहऱ्यांचे मुखवटे गळून पडले असते. हीच कारवाई अनेकांच्या वर्मी लागल्याने अधिकारी लॉबीने एकत्र येत मुंढे यांच्या विरोधात मोर्चेबांधणी केल्याची चर्चा आता मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये रंगली आहे. (Tukaram Mundhe)
(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या अवमानप्रकरणी राहुल गांधींच्या इंग्लंड दौऱ्याचा तपशील सादर करण्याची मागणी)
कौतुक एका बाजूला, बदली दुसऱ्या बाजूला
काही दिवसांपूर्वीच राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे हे अत्यंत चांगले काम करत असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले होते. मात्र, एका बाजूला कौतुक होत असताना दुसरीकडे अचानक झालेली ही बदली म्हणजे ‘प्रामाणिकपणाची शिक्षा’ असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. कर्तव्यकठोर अधिकारी कोणत्याही सरकारला किंवा प्रस्थापित व्यवस्थेला मानवत नाहीत, हेच या बदलीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. (Tukaram Mundhe)
२१ वर्षांत २४ बदल्यांचा विक्रम
२००५ च्या बॅचचे अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांच्यासाठी बदल्या काही नवीन नाहीत. पण, ज्या वेगाने त्यांनी दिव्यांग विभागातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी चव्हाट्यावर आणायला सुरुवात केली होती, त्या वेगाला या बदलीने आता ‘ब्रेक’ लागला आहे. मदत व पुनर्वसन विभागात गेल्यानंतरही मुंढे आपली तीच आक्रमक कार्यशैली कायम ठेवतात की नवी व्यवस्था त्यांना रोखण्यात यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (Tukaram Mundhe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

