Lokmanya Tilak : लोकमान्य टिळकांचे खरे वारसदार सरदार वल्लभभाई पटेलच – डॉ. रिझवान कादरी

218

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला, तो लोकमान्य टिळकांच्या Lokmanya Tilak प्रेरणेमुळेच. साबरमती नदीच्या किनारी टिळकांनी स्वराज्याचा मूलमंत्र दिला. त्याने सरदार पटेल प्रेरित झाले आणि आपणही राष्ट्रासाठी योगदान दिले पाहिजे, अशी भावना त्यांच्यात जागृत झाली. लोकमान्य टिळकांशी सरदार पटेलांची झालेली भेट, ही त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. टिळकांची कणखर वाणी, प्रखर बुद्धिमत्ता आणि शैली पटेलांनी आत्मसात केली होती. त्यांचा स्वराज्य ते सुराज्य हा संकल्प सरदार पटेलांनी पूर्ण केला. त्यामुळे लोकमान्य टिळकांचे खरे राजकीय वारसदार सरदार पटेलच होते, असे स्पष्ट मत डॉ. रिझवान कादरी यांनी व्यक्त केले.

नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे मानद सदस्य आणि लोकमान्य टिळकांवर संशोधन करणारे प्रा. डॉ. रिझवान कादरी यांनी मंगळवारी, १ ऑगस्ट रोजी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या कार्यालयाला भेट दिली. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्निल सावरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कादरी म्हणाले, माझ्या संशोधनाचा मुख्य विषय महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल हा असला, तरी या दोघांना समजून घ्यायचे असल्यास आधी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक समजून घ्यावे लागतील, याची प्रचिती मला आली. त्यामुळे सर्वात आधी मी टिळकांचा अभ्यास केला. कारण टिळकांविना गांधी आणि सरदार पटेल अपूर्ण आहेत.

(हेही वाचा Narendra Modi : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा निधी नमामि गंगे प्रकल्पाला देणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी)

लोकमान्यांच्या प्रेरणेमुळेच सरदार पटेलांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश   

जात-धर्म-पंथ असे बंध तोडून समस्त भारतवासियांनी टिळकांना ‘लोकमान्य’ ही पदवी दिली. स्वराज्याचा महामंत्र देणारा हा युगपुरुष होता. सरदार वल्लभभाई पटेल यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला तो लोकमान्य टिळकांच्या Lokmanya Tilak प्रेरणेमुळेच. हे मी पुराव्यांसह सिद्ध करू शकतो. १९१६ मध्ये जेव्हा टिळक अहमदाबादला आले, तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी सकाळी ४.३० वाजता जवळपास ४० हजार लोक स्टेशनवर आले होते. या महान नेत्याला पाहण्यासाठी, त्याचे दर्शन घेण्यासाठी ही गर्दी जमली होती. साबरमती नदीच्या किनारी टिळकांनी स्वराज्याचा मूलमंत्र दिला. त्याने सरदार पटेल प्रेरित झाले आणि आपणही राष्ट्रासाठी योगदान दिले पाहिजे, अशी भावना त्यांच्यात जागृत झाली. लोकमान्य टिळकांशी सरदार पटेलांची झालेली भेट, ही त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली, असेही कादरी यांनी सांगितले.

…आणि लोकमान्य टिळकांची प्रतिमा झळकली ब्रिटिशांच्या उद्यानात

भारतावर ब्रिटिशांचा अंमल असताना अहमदाबादला राणी व्हिक्टोरिया गार्डनच्या प्रवेशद्वारासमोर लोकमान्य टिळकांची प्रतिमा लावण्याची हिम्मत त्यावेळी सरदार पटेल यांनी केली होती. स्वराज्याचा मूलमंत्र दिलेल्या टिळकांची प्रतिमा ब्रिटिशांनी तयार केलेल्या उद्यानाजवळ झळकावून पटेलांनी स्वतःचे राजकीय आयुष्य पणाला लावले होते. त्यामुळे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे म्हणणाऱ्या टिळकांचा खरा राजकीय वारसदार सरदार वल्लभभाई पटेल होते, असेही कादरी म्हणाले.

टिळकांच्या समाधीशेजारची दुसरी समाधी कुणाची?

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांच्या समाधी शेजारी आणखी एक समाधी आहे, ती विठ्ठलभाई पटेल यांची. ते सरदार वल्ल्भभाई पटेल यांचे ज्येष्ठ बंधू होते. सेन्ट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लिचे पहिले भारतीय स्पीकर होण्याचा मान त्यांना मिळाला होता. टिळक आणि विठ्ठलभाई यांच्यातील मैत्री सख्ख्या भावंडांहूनही अधिक होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिले होते की, माझ्या पार्थिवाचे शास्त्रीयरित्या जतन करून देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या समाधी शेजारी त्यावर अंत्यसंस्कार करावेत. परंतु ब्रिटश सरकार त्याला कदापी तयार झाले नाही. कारण, टिळकांचे देहावसान झाले तेव्हा जवळपास साडेआठ लाख लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. तसे वातावरण पुन्हा तयार होऊ नये, हा ब्रिटिशांचा होतू होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना तशी परवानगी नाकारून सोनापूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी आठवण  डॉ. रिझवान कादरी यांनी सांगितली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.