उरलेला उबाठा गट मतदारच BMC Elections मध्ये संपवतील; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

94
'पळपुटे विरोधक' ते 'भ्रष्ट इंडिया कंपनी'; BJP चा राहुल गांधी आणि संजय राऊतांवर घणाघात
  • विशेष प्रतिनिधी

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, भारतीय जनता पार्टीचे (BJP) माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी उबाठा गटावर जोरदार टीका केली आहे. “विधानसभा निवडणुकीत मतदारांनी उबाठा गटाचा गेम केला असून, उरलेला टप्पा मतदार महापालिका निवडणुकीत पूर्ण करतील,” असा प्रखर हल्लाबोल त्यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले की, मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर होईल.

नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, उबाठा गटाचा त्यांच्या तथाकथित मित्रपक्षांनीही टप्प्याटप्प्याने गेम केला आहे. “पहिल्या टप्प्यात काँग्रेसने मुंबईत स्वबळाची भाषा केली. दुसऱ्या टप्प्यात उबाठा गटाला मनसेसोबत जोडून देण्याचा डाव टाकण्यात आला,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “२०१७ मध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना दिलेल्या टाळीला प्रतिसाद न दिल्याचा बदला आता राज ठाकरे घेतील. त्यामुळे मनसे उबाठा गटाशी युती करणार नाही,” असा दावाही त्यांनी केला.

(हेही वाचा – Delhi Bomb Blast प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दारला २६ डिसेंबरपर्यंत एनआयए कोठडी)

राऊतांची अस्वस्थता उघड

मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Elections) रणधुमाळीच्या सुरुवातीलाच उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार परिषदांमधून अस्वस्थ दिसत असल्याचे बन यांनी सांगितले. “अपयशाची खात्री असल्यानेच राऊतांची वायफळ बडबड सुरू आहे. पत्रकारांनी महापौर कोणाचा होणार, उबाठाचा की मनसेचा, असा थेट प्रश्न विचारल्यावर राऊतांनी उत्तर देणे सोयीस्करपणे टाळले,” असा टोला त्यांनी लगावला.

फडणवीस सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही

माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) प्रकरणावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, “कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर कोकाटेंकडून तात्काळ खाती काढून घेण्यात आली. कोर्टाची मूळ प्रत आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य ती कारवाई करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या सरकारमध्ये दोषींवर कारवाई होते; कोणाचीही हयगय केली जात नाही.”

याच मुद्द्यावर त्यांनी मविआ सरकारवर निशाणा साधत म्हटले की, “नवाब मलिक यांच्यावर आरोप झाल्यानंतर मविआ सरकारने त्यांचा राजीनामा घेण्याची तसदीही घेतली नव्हती. त्यामुळे राऊतांनी आम्हाला फुकाचे सल्ले देऊ नयेत,” असे खडसावून सांगितले.

(हेही वाचा – Ind vs SA, T20 Series : धुरक्यामुळे लखनौतील सामना रद्द करण्याची वेळ, बीसीसीआयच्या वेळापत्रकावर चाहत्यांची टीका)

‘भाजपा पक्ष गिळते’ आरोपाला प्रत्युत्तर

भाजपा शिंदे गटाचा पक्ष गिळणार असल्याच्या संजय राऊतांच्या आरोपांना उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले, “भाजपा कधीही कोणाचा पक्ष गिळंकृत करत नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कर्माने शिवसेना संपवली. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून बसले, तेव्हाच शिवसेनेची अधोगती सुरू झाली.”

तसेच, “पक्षफोडीची सुरुवात उद्धव ठाकरे यांनीच मनसेचे सात नगरसेवक फोडून केली होती,” अशी आठवणही त्यांनी करून दिली.

ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी भाजपा कटीबद्ध

ड्रग्सच्या मुद्द्यावर राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ड्रग्सविरोधात सक्षमपणे पावले उचलत आहेत. ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी भाजपा पूर्णपणे कटीबद्ध आहे. पोलीस यंत्रणा योग्य ती चौकशी, तपास आणि दोषींवर कठोर कारवाई करेल.”

एकंदरीत, मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, उबाठा गटावर थेट राजकीय हल्ले चढवले आहेत. येत्या काळात महापालिका रणधुमाळी आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.