शरद पवारांच्या मनात काय?;’इंडिया’च्या मुंबईतील बैठकीचे यजमानपद दिले ठाकरे गटाला

103
शरद पवारांच्या मनात काय?;'इंडिया'च्या मुंबईतील बैठकीचे यजमानपद दिले ठाकरे गटाला

‘पवारसाहेब आणि मी एकच आहोत’, असे विधान जाहीर सभेत करीत अजित पवार यांनी त्यांना शरद पवारांचे समर्थन असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांत पवारांच्या आक्रमक भूमिकेत मवाळपणा आल्याचे दिसले. बंडखोरी केलेल्या आमदारांविरोधात भाष्य करायचे नाही, नियोजित सभा पुढे ढकलायच्या, कायदेशीर लढाई लढायची नाही, एकीकडे मोदींना विरोध करायचा आणि त्यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावायची, अशा दुहेरी भूमिकेत पवार दिसून येत आहे. त्यात भर म्हणजे विरोधकांनी मोदींविरोधात ‘इंडिया’ नावाने उघडलेल्या आघाडीच्या बैठकीचे यजमानपद भूषवायची संधी असताना, त्यांनी ते ठाकरे गटाला बहाल केले आहे. त्यामुळे शरद पवार दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहेत का, त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

या महिन्याच्या शेवटी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईतील ग्रँड हयात येथे तिसरी बैठक होणार आहे. या बैठकीला पाच राज्यांचे मुख्यमंत्री आणि राहुल गांधींसह देशभरातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीची जबाबदारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना वाटून देण्यात आली आहे. देशपातळीवरचे सर्वात अनुभवी नेते आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीचे यजमानपद शरद पवार स्वीकारतील, अशी चर्चा होती.

(हेही वाचा – Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ८० टक्के : आता कपात मागे घेण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय नाही)

मात्र, स्वतः नामानिराळे राहून पवारांनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात हा धोंडा बांधला. त्यामुळे मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणाऱ्या या दोन दिवसीय बैठकीचा सर्व खर्च ठाकरे गटाला करावा लागणार आहे. शिवसेना पक्षाच्या खात्यातील ५० कोटी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडून मागून घेतल्यानंतर शिवसैनिकांचा हा पैसा विरोधकांच्या बैठकीचे यजमानपद मिरवण्यासाठी करणार का, असा सवाल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून विचारला जात आहे.

सुरक्षा पुरवा; संजय राऊतांचे सरकारला साकडे

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईतील ग्रँड हयातमध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला पाच राज्यांचे मुख्यमंत्री आणि राहुल गांधींसह देशभरातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्य सरकारची मदत घेणार आहोत. राज्य सरकारची मदत आम्हाला लागेल. आमचे काही नेते राज्य सरकारशी संवाद साधून नेत्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न मार्गी लावतील, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.