दादर-माहीम, वडाळा आणि धारावीच्या विभागप्रमुख पदासाठी वरळीतील नेता होणार आयात?

128

दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघातील विभागप्रमुख आणि आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर या रिक्त विभागप्रमुख पदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुणाही शिवसैनिकाची वर्णी लावली नाही. आजवर शिंदे गटात सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या रिक्त जागी पक्ष प्रमुखांनी त्यांची हकालपट्टी केल्याचे दाखवत त्या जागी नवीन पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. परंतु सदा सरवणकर यांनी शिंदे गटात सामील झाल्यानंतर विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला. तरीही या पदी कुणाही शिवसैनिकाची नियुक्ती केली जात नसल्याने शिवसेनेकडे विभागात लायक विभागप्रमुख मिळेना असे बोलले जात आहे. त्यामुळे वरळीतील विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांची या विभागप्रमुख पदी नियुक्त करण्याच्या विचारात शिवसेना असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विभाग प्रमुखाचे पद रिक्त

दक्षिण -मध्य लोकसभा मतदारसंघातील दादर- माहीम, धारावी आणि वडाळा या तीन विधानसभांच्या विभाग प्रमुखपदाची जबाबदारी ही आमदार सदा सरवणकर यांच्याकडे होती. परंतु शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट स्वतंत्र झाल्यानंतर त्यात आमदार सदा सरवणकर हे सुद्धा सामील झाले. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दादर- माहीम भागामध्ये शिवसेनेच्या विभाग प्रमुखाचे पद अद्याप रिक्त आहे.  सरवणकर हे शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांनी आपल्या विभाग प्रमुख तसेच त्यांच्यासोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या भागातील या पदाधिकाऱ्यांची पद रिक्त आहेत.

(हेही वाचा शरद पवारांची कोलांटउडी! आधी बाबासाहेब पुरंदरेंचे कौतुक नंतर टीका)

विभागप्रमुख पदाची जबाबदारी पार पाडली होती

दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेना भवन या भागात आहे. पण शिवसेना भवन असलेल्या भागातच शिवसेनेला सदा सरवणकर यांच्या जागी नवीन विभाग प्रमुख नेमता येत नाही. सदा सरवणकर हे सोडून गेल्यानंतर पुन्हा माजी महापौर व  माजी नगरसेवक मिलिंद वैद्य हे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांनी यापूर्वी विभाग प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे त्यांचे नाव विभाग प्रमुख पदाच्या शर्यतीत आहे. याशिवाय उपविभाग प्रमुख राजू पाटणकर,  माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांचीही नावे चर्चेत आहेत. यापैकी कुणाला विभागप्रमुख बनवले जातात, यावर अद्यापही पक्षाला निर्णय घेता आलेला नाही.

सुनील शिंदेंचे नाव पुढे येत आहे

या मतदारसंघातून विभाग प्रमुख म्हणून सुनील शिंदे यांचेही नाव सुद्धा चर्चेत आहे. सुनील शिंदे यांना या विभागाचे विभाग प्रमुख बनवण्याचा शिवसेनेचा विचार आहे आणि भविष्यात शिंदे हे या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असेही बोलले जात आहे. मात्र शिवसेनेकडून अद्यापही हे पद भरले जात नसल्याने नक्की घोडा अडतो कुठे, असा प्रश्न पडू लागला आहे. शिवसेनेला या विभागातील पद रिक्त ठेवणे हे पक्षाच्या दृष्टीकोनातून योग्य नसून विभाग प्रमुख नसल्याने शिवसैनिकही संभ्रमावस्थेत आहेत. अनेक शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असले तरीही त्यांचे एक मन हे शिंदे गटाकडे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शिवसैनिक द्विधा मनस्थितीत असताना निष्ठावान आणि आपल्या मर्जीतील विभाग प्रमुख नेमण्यावर शिवसेनेचा भर राहणार आहे. आणि त्यामुळेच तीन मतदारसंघांच्या बाहेरील व्यक्तीला तथा लोकप्रतिनिधीला आयात करण्याची वेळ शिवसेनेवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यातूनच सुनील शिंदे यांचे नाव पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना आपला मतदार संघ सोडला. त्यामुळे शिंदे यांना आता विधान परिषदेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळेच भविष्यात शिवसेनेचे हे तिन्ही विधानसभा मतदार संघ संघटनात्मक बांधण्याची जबाबदारी सुनील शिंदे यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.