शिवसेनेने बेस्ट समितीत इतिहास रचला

महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात हे प्रथमच घडले असून, तब्बल पाच वेळा अध्यक्षपद भूषवणाऱ्या आशिष चेंबूरकर यांनी ही किमया साधली आहे.

93

बेस्टच्या डिजिटल तिकीट निविदेचे कंत्राट मर्जीतील कंत्राटदाराला देण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाचे ३५ कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा आरोप करत या प्रस्तावाला विरोध दर्शवणाऱ्या भाजपाला मंगळवारी झालेल्या बैठकीत साधी बोलण्याची संधीही दिली गेली नाही. भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे पटलावर ठेवलेले उर्वरित सातही प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना मंजूर करत अवघ्या तीन मिनिटांमध्ये सभेचे कामकाज संपवले. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात हे प्रथमच घडले असून, तब्बल पाच वेळा अध्यक्षपद भूषवणाऱ्या आशिष चेंबूरकर यांनी ही किमया साधली आहे.

काय आहे आरोप?

बेस्ट डिजिटल तिकीट निविदेचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या पटलावर आल्यानंतर भाजपाने यात ३५ कोटी रुपयांचे नुकसान संभावत असल्याचा आरोप केला होता. यामध्ये निविदेत भाग घेण्यासाठी २० संस्था स्वारस्य दाखवतात आणि प्रत्यक्षात तीन कंपन्याच भाग घेतात, त्यातील एक कंपनी बाद होते. आणि ज्या दोन कंपन्या उरतात त्यातील एका कंपनीला केवळ ५ गुण मिळतात. त्यामुळे झोपहॉप ही केवळ एकमेव कंपनी पात्र ठरते.

(हेही वाचाः बेस्टला झोपवायला चालली शिवसेना: डिजिटल तिकिटांच्या निविदेत कोट्यवधींचे होणार नुकसान)

भ्रष्टाचाराला साथ देण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी- शिंदे

बेस्ट संस्थेस निविदेतून प्राप्त झालेला १४ पैसे दर हा फारच जास्त असून, अनेक संस्था ७ पैसे दराने प्रस्तावित प्रकल्पाची त्यांच्या प्रसारित दराप्रमाणे अंमलबजावणी करण्यास तयार आहेत. ज्यामुळे बेस्ट उपक्रमाचे ३५ कोटी वाचतील, असे लेखी पत्राद्वारे बेस्टचे महाव्यवस्थापक यांना कळवण्यात आले होते. असे असतानाही सत्ताधारी पक्षाने केवळ मर्जीतील कंपनीला कंत्राट देण्यासाठी, भ्रष्टाचाराला साथ देण्यासाठी चर्चा न करताच सदर प्रस्ताव मंजूर केला असल्याचा आरोप भाजपाचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

भाजपाचा धरणे आंदोलनाचा इशारा

हा प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्याच असून यावर बोलण्याची मागणी करुनही आमच्या सदस्यांना बोलू न देता हा प्रस्ताव विनाचर्चा मंजूर करण्यात आला. त्यामुळे या निविदेतील भ्रष्टाचार आणि अध्यक्षांच्या मनमानी कामकाजाविरोधात भाजपा न्यायालयात जाणार असून, बुधवारपासून बेस्ट भवनवर अध्यक्षांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन पुकारले जाईल, असाही इशारा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

(हेही वाचाः शिवसेना आमदाराची भाजपा नगरसेविकेच्या वॉर्डात ढवळाढवळ)

इतिहासातील पहिलीच घटना

आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत असा प्रकार कधीही आणि यापूर्वीच्या कोणत्याही अध्यक्षांच्या कारकिर्दीत झालेला नाही. पटलावर एकूण ८ प्रस्ताव होते, पण एकाही प्रस्तावावर अध्यक्षांनी बोलायला न देता चर्चेविना सर्व प्रस्ताव अवघ्या तीन मिनिटांमध्ये मंजूर केले आणि सभेचे कामकाज संपवले. याची नोंद बेस्टच्या इतिहासात होईल. बेस्टच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. आज या समितीचा सदस्य का आहे असे मला वाटू लागले आहे. विशेष म्हणजे पाच वेळा अध्यक्षपद भूषवणाऱ्या आशिष चेंबूरकर यांच्याकडून हा प्रकार घडलेला आहे. बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी याबबात तीव्र नाराजी व्यक्त करत आपण याची सर्व माहिती मागवल्याचे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.