संघ राष्ट्रीय बाण्याची संघटना! शिवसेनेने जावेद अख्तरांना सुनावले 

परकीय आक्रमकांनी हिंदू संस्कृतीवर तलवारीच्या बळावर आक्रमण केले, ब्रिटिश काळात धर्मांतरे झाली. त्या सगळय़ांविरुद्ध हिंदू समाज लढत राहिला, पण तो तालिबानी कधीच झाला नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

80

‘‘मला या देशाचा खोमेनी व्हायचे नाही’’, असे सरळ विधान त्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. शिवसेना किंवा संघाचे हिंदुत्व व्यापक आहे, ते सर्वसमावेशक आहे. त्यात मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, महिलांचे हक्क अशा पुरोगामी विचारांना स्थान आहे. संघ किंवा शिवसेना तालिबानी विचारांचे असते तर या देशात तिहेरी तलाकविरुद्ध कायदे झाले नसते व लाखो मुसलमान महिलांना स्वातंत्र्याची किरणे दिसली नसती. संघाची स्वातंत्र्यलढय़ातील भूमिका संशयास्पद असल्याचा आक्षेप काही विरोधक घेत असतात. तो मुद्दा बाजूला ठेवा; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक राष्ट्रीय बाण्याची संघटना आहे, याबाबत दुमत असण्याची शक्यता नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून संगीतकार जावेद अख्तर यांना सुनावले.

…तरीही हिंदूंनी संयम सोडला नाही!

देशातील बहुतांश लोकसंख्या ही धर्मनिरपेक्ष आहे. ती सभ्य असून एकमेकांचा आदर करते. त्यामुळे त्यांना तालिबानी विचार आकर्षित करू शकत नसल्याचे जावेद अख्तर म्हणतात ते बरोबर आहे. हिंदुस्थानात हिंदुत्ववादी विचार हा पूर्वापार आहे. कारण रामायण, महाभारत हा हिंदुत्वाचा आधार आहे. परकीय आक्रमकांनी हिंदू संस्कृतीवर तलवारीच्या बळावर आक्रमण केले, ब्रिटिश काळात धर्मांतरे झाली. त्या सगळय़ांविरुद्ध हिंदू समाज लढत राहिला, पण तो तालिबानी कधीच झाला नाही. हिंदूंची मंदिरे तोडली गेली, जबरदस्तीने धर्मांतरे घडविली गेली, पण हिंदू समाजाने संयम सोडला नाही. याच अतिसंयमाचा हा समाज बळी पडत राहिला आहे. जगातील प्रत्येक राष्ट्र आज धर्माच्या पायावर उभे आहे. चीन, श्रीलंकेसारख्या राष्ट्रांचा अधिकृत धर्म बौद्ध, अमेरिका, युरोपियन राष्ट्रे ख्रिश्चन, तर बाकी सर्व राष्ट्रे ‘इस्लामिक रिपब्लिक’ म्हणून आपापल्या धर्माची शेखी मिरवीत आहेत; पण जगाच्या पाठीवर एक तरी हिंदू राष्ट्र आहे काय? हिंदुस्थानात बहुसंख्य हिंदू असूनही ते राष्ट्र आज धर्मनिरपेक्षतेचाच झेंडा फडकवून उभे आहे. बहुसंख्य हिंदूंना सतत डावलले जाऊ नये हीच एक माफक अपेक्षा त्यांची आहे. जावेद अख्तर, आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे ना?, असेही शिवसेनेनं म्हटले आहे.

(हेही वाचा : अनिल देशमुखांना दिसता क्षणी अटक! अखेर कुणी दिले आदेश?)

हिंदू राष्ट्राची कल्पना मवाळ!

अफगाणिस्तानात निर्घृण तालिबान्यांनी जो रक्तपात, हिंसाचार घडविला आहे व मनुष्यजातीचे पतन चालविले आहे, ते काळजाचा थरकाप उडविणारे आहे. तालिबान्यांच्या भीतीने लाखो लोकांनी देश सोडला आहे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. अफगाणिस्तानचा नरक बनला आहे. तालिबान्यांना तेथे फक्त धर्माचे म्हणजे शरीयतचेच राज्य आणायचे आहे. आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवू पाहणारे जे जे लोक व संघटना आहेत, त्यांची हिंदू राष्ट्रनिर्मितीची कल्पना मवाळ आहे. धर्माच्या आधारावर पाकिस्तान व हिंदुस्थान ही दोन राष्ट्रे बनल्यावर हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात सातत्याने डावलले जाऊ नये, हिंदुत्व म्हणजे एक संस्कृती असून त्यावर आक्रमण करणाऱयांना रोखण्याचे हक्क ते मागत आहेत. अयोध्येत बाबरी पाडण्यात आली व तेथे राममंदिर उभे राहत आहे, पण आजही बाबरीसाठी जे हिजडेगिरी करीत आहेत त्यांचा बंदोबस्त करा व तो कायद्याने करा, असे कोणी म्हणत असतील तर ते तालिबानी कसे? कश्मीरातून 370 कलम हटविले. त्यामुळे कश्मीरचा कोंडलेला श्वास मोकळा झाला. हा श्वास पुन्हा बंद करा, अशी मागणी करणारे लोकच तालिबानी आहेत. कश्मिरी पंडितांची घरवापसी होणे गरजेचे आहे. त्यावर कोणाचेही मतभेद असता कामा नयेत. मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली कोणताही उन्माद येथे मान्य नाही. इराणमध्ये खोमेनीचे राज्य होते व आता अफगाणिस्तानात तालिबान्यांचे राज्य आले. या दोन्ही राजवटींशी हिंदुत्वाचा संबंध जोडणे हा  संस्कृतीचा अपमान ठरतो, अशी शिवसेनेने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.