आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटींची तरतूद

94

राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरिता आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटीची तरतूद सन २०२२-२३ मध्ये केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

( हेही वाचा : आता शाळेच्या पुस्तकालाच जोडली जाणार वही; काय म्हणाले शिक्षणमंत्री?)

नंदुरबार नगर परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीर येथे ते बोलत होते. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भूसे, खासदार डॉ. हिना गावीत, खासदार राजेंद्र गावीत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. आदिवासी समाजासाठी अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद केली आहे. राज्यातील विकास कामांना गती व चालना देण्याचे काम हे सरकार करीत असून, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

४०० पेक्षा अधिक शासन निर्णय

सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या चार महिन्यांत ४०० पेक्षा अधिक शासन निर्णय काढले आहेत. राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी राज्यात मोठे उद्योगधंदे येण्याकरिता शासन प्रयत्नशील आहे. नंदुरबार शहरातील रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा तसेच विविध विकासकामासाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच नवापूर मधील १३२ के.व्ही विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. नंदुरबार नगर परिषदेची नूतन इमारत अतिशय सुंदर आणि सुसज्ज असून नागरिकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकापर्ण करण्यात आले. ही इमारत उभारण्यासाठी १५ कोटी १९ लाख एवढा खर्च झाला आहे. ४५८२.९० चौरस मीटर क्षेत्रफळावर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यात तळमजला अधिक तीन मजले, असून प्रथम मजल्यावर पोर्च, एन्ट्रन्स लॉबी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती याची दालने तर दुसऱ्या मजल्यावर १०५ व्यक्तींसाठी आसन व्यवस्था असलेले भव्य सभागृह, महिला व बाल विकास समिती, विरोधी पक्षनेत्यांची दालने, महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, रेकॉर्ड, स्टोअर रुम, अतिक्रमण व बाजार विभाग, दिवाबत्ती, अग्निशमन, लेखा परिक्षक विभागाची कार्यालये आहेत. तर तिसऱ्या मजल्यावर रेकॉर्ड रुम, लिफ्ट रुम, क्लॉक टॉवरची रुम आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.