स्थायी समितीच्या शेवटच्या सभेत गोंधळात गोंधळ: हजारो कोटींचे प्रस्ताव चर्चेविना मंजूर

या गोंधळातच हजारो कोटी रूपयांचे काही प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केले.

141

मुंबई महापालिकेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या तब्बल ३८९  प्रस्तावांपैकी काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले, तर काही प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहेत. यामध्ये विकासकामांचे, मोठ्या कंत्राट कामांचे प्रस्ताव राखून ठेवतानाच काही विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल ६ हजार कोटींच्या प्रस्तावांपैकी काही हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर झाले.

या प्रस्तावांवरील नियमबाह्य कामकाज प्रक्रियेबाबत आक्षेपही नोंदवू न दिल्याने, भाजपने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याला शिवसेनेनेही घोषणाबाजी देत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या गोंधळातच हजारो कोटी रूपयांचे काही प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केले.

(हेही वाचाः अंधेरीत डान्स बारवर छापा, १८ मुली ताब्यात, २९ जणांवर कारवाई)

भाजपची घोषणाबाजी

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीपुढे सोमवारी २७० प्रस्ताव मंजुरीला होते. तर आधीच्या सभेपुढील राखून ठेवलेले ९८ अधिक ११ अशाप्रकारे १०९ असे एकूण ३७९ प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी समितीच्या कामकाजाला सुरुवात केल्यानंतर, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी कामकाज प्रक्रियेवर आपला हरकतीचा मुद्दा असल्याचे सांगत अध्यक्षांकडे परवानगी मागितली. परंतु अध्यक्षांनी ही मागणी धुडकावून कामकाजाला सुरुवात केली. त्यामुळे भाजपच्या सर्व सदस्यांनी घोषणाबाजी देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘गली गली शोर है, यशवंत जाधव चोर है’, ‘यशवंत जाधव हाय हाय’. ‘यशवंत जाधव भ्रष्ट आहे’, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

शिवसेनेचे जोरदार प्रत्त्युत्तर

भाजपच्या सदस्यांच्या या गोंधळात यशवंत जाधव यांनी काही प्रस्ताव मंजूर केले, तर काही प्रस्ताव राखून ठेवत कामकाज पुढे रेटण्याचे काम केले. मात्र, यावेळी भाजपचे सदस्य मकरंद नार्वेकर यांनी समितीच्या कामकाजाचे व्हिडिओ चित्रण करण्यास सुरुवात करता माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजुल पटेल, सुजाता पाटेकर यांनी पुढे धाव घेतली. त्याबरोबरच राजेश्री शिरवडकर, ज्योती अळवणी यांनीही धाव घेतली. त्यामुळे या सर्वांमध्ये शाब्दिक चकमक झाली. घोषणाबाजी अधिकच तीव्र झाली आणि भाजकडून गली गली में शोर है, अशी घोषणा झाल्यानंतर भाजप चोर है, अशी घोषणा प्रत्युतरादाखल शिवसेनेच्या सदस्यांकडून दिली जात होती. या गोंधळातच समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पटलावरील सर्व प्रस्ताव उडवून टाकत काही प्रस्ताव मंजूर तर काही राखून ठेवले.

(हेही वाचाः लढायचं ते जिंकण्यासाठी! असे म्हणत मनसेची जोरदार तयारी)

अवघ्या अर्ध्या तासात सभा गुंडाळली

स्थायी समितीची नियमित बैठकीची वेळ ही दुपारी दोनची होती. परंतु प्रत्यक्षात समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे आपल्या सदस्यांसह २ वाजून ४४ मिनिटांनी सभागृहात दाखल झाले आणि समितीच्या कामकाजाला सुरुवात केली. पटलावर मागील बैठकांमधील एकूण ११९ प्रस्तावांसह सोमवारच्या बैठकीतील २७० प्रस्ताव विचारात घेतले. मात्र, या एकूण ३७९ प्रस्तावांवर अवघ्या ३२ मिनिटांमध्ये निर्णय घेत बैठक गुंडाळण्यात आली. ही सभा ३ वाजून १६ मिनिटांनी संपली.

सत्ताधा-यांनी मुंबईकरांचे ६ हजार कोटी खाल्ले

भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, यातील काही प्रस्ताव रविवारी रात्रीपर्यंत पाठवण्यात आले होते. त्यामुळे एवढे प्रस्ताव वाचणार कधी? असा सवाल उपस्थित केला. या कामकाज प्रक्रियेबाबत आपला हरकतीचा मुद्दा होता, परंतु आपल्याला या मुद्द्याद्वारे आक्षेप नोंदवू दिला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्ष हा योजनाबध्द पध्दतीने भ्रष्टाचार करत असून, अध्यक्ष हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे ६ हजार कोटी रुपये खाल्ले असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला. लोकशाही मार्गाने चर्चा करू न देता ते प्रस्ताव मंजूर करत आहेत, हे योग्य नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः भावी डॉक्टरांना मोदींनी दिली खूशखबर! खासगी रुग्णालयांच्या फीबाबत घेतला मोठा निर्णय)

आम्ही निवडणुकांचा विचार करत नाही- जाधव

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आजवर शिवसेनेने पारदर्शकच कामकाज केले आहे. कोणाला हरकतीचा मुद्दा घ्यायला द्यायचा हा अध्यक्षांचा अधिकार आहे. त्यामुळे मागील तीन ते चार सभांचा अजेंडा असल्याने आपण त्यांना हरकतीचा मुद्दा प्रारंभी घेऊ दिला नाही. पण शेवटी तो घेतला जावा अशी विनंतीही केली होती. समितीपुढे प्रशासन प्रस्ताव आणत असता, विकासाच्या प्रस्तावांना समितीमध्ये मंजुरी दिली जाते. समितीत विकासकामांच्या प्रस्तांवांचा विचार केला जातो, आकड्यांचा नाही. आम्ही मंजूर केलेले प्रस्ताव हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केले नाही, तर मुंबईच्या विकासासाठी मंजूर केले. आम्ही निवडणुकीचा विचार करत नाही, परंतु जे लोक निवडणुकीचा विचार करतात, तेच लोक धांगडधिंगाडा करतात, गोंधळ घालतात, असे यशवंत जाधव यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

(हेही वाचाः बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला होणार अटक?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.