BMC मध्ये ‘अर्बन टायगर’च्या मोठ्या बंडाची तयारी; शिंदे गटाचे मिशन ४५ यशस्वी होणार?

118
BMC मध्ये 'अर्बन टायगर'च्या मोठ्या बंडाची तयारी; शिंदे गटाचे मिशन ४५ यशस्वी होणार?
BMC मध्ये 'अर्बन टायगर'च्या मोठ्या बंडाची तयारी; शिंदे गटाचे मिशन ४५ यशस्वी होणार?
  • ​विशेष प्रतिनिधी

​मुंबई महानगरपालिकेत (BMC) शिवसेनेच्या शिंदे गटाने हाती घेतलेले ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) सध्या एका महत्त्वपूर्ण वळणावर येऊन थांबले आहे. हे ऑपरेशन गुंडाळले नसून, त्याला तात्पुरता ब्रेक लावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता अधिक सावध आणि मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे. केवळ काही नगरसेवकांना फोडण्याऐवजी, थेट ४५ नगरसेवकांचा गट एकत्र करून ‘अर्बन टायगर’चे मोठे बंड घडवून आणण्याचे शिंदे गटाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट होत आहे.

​मुंबई महापालिकेत (BMC) सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडे ६५ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. कायदेशीर पेच टाळण्यासाठी आणि पक्षांतर बंदी कायद्याचा अडथळा दूर करण्यासाठी शिंदे गटाला दोन-तृतीयांश बहुमताचा, म्हणजेच किमान ४३ ते ४५ नगरसेवकांच्या बंडाची आवश्यकता आहे. सध्या सुमारे २२ नगरसेवक शिंदे गटात येण्यास उत्सुक असले, तरी ४५ चा आकडा पूर्ण झाल्याशिवाय अधिकृत प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. या धोरणामुळेच शिंदे गटाने इच्छुक नगरसेवकांना ‘वेटिंग’वर ठेवले आहे.

(हेही वाचा – Kolhapur : जन्मत:च दोन्ही हात नाहीत, तरी जिद्दीच्या जोरावर बनली मुंबई महापलिकेत अधिकारी; माऊली आडकुरची प्रेरणादायी कहाणी)

​शिंदे गटाचे महापालिकेतील गटनेते अमेय घोले (Amey Ghole) यांनी या रणनीतीवर भाष्य करताना सांगितले की, “आम्हाला कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी ४३ ते ४५ नगरसेवकांचा आकडा गाठायचा आहे. डिसेंबरच्या अखेरीस महापालिकेत तुम्हाला ‘ऑपरेशन अर्बन टायगर’ पूर्ण झालेले दिसेल.” त्यांनी किशोरी पेडणेकर यांच्याबाबत सूचक विधान करत, पक्षाची दारे शिंदे गटात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी उघडी असल्याचेही नमूद केले.

​दुसरीकडे, ठाकरे गटाने या सर्व दाव्यांना खोडून काढले आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाच्या या मनसुब्यांची थट्टा उडवत, “आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे टायगर’ आहोत, आम्ही फुटणार नाही,” असे ठणकावून सांगितले आहे. अमेय घोले यांच्या विधानावर टोला लगावताना, “त्यांनी कधी टायगर पाहिलेत का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

​एकीकडे ठाकरे गट आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी धडपडत असताना, दुसरीकडे शिंदे गटाने ४५ नगरसेवकांचे लक्ष्य गाठण्यासाठी आगामी सहा महिन्यांची दीर्घकालीन योजना आखली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या (BMC) राजकारणात हा ‘अर्बन टायगर’ नक्की कोणाच्या आदेशावर चालणार आणि डिसेंबरअखेर कोणत्या राजकीय हालचाली घडणार, याकडे आता संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.