BJP : मविआ झाली अर्धी, महायुतीकडे गर्दी

78
  • सुहास शेलार

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर निर्माण झालेला राजकीय तणाव हळूहळू निवळत असतानाच, केंद्राकडून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सतर्क झाले असून, युत्या-आघाड्यांचा खेळ रंगात आला आहे. प्रत्येक पक्ष स्वतःच्या पदरात अधिकच्या जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. असे असले तरी, महायुतीसमोर वाढती गर्दी आणि महाविकास आघाडीपुढे (MVA) सततची गळती थांबवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंपाठोपाठ अजित पवारांनी राष्ट्रवादीत भूकंप घडवून आणल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा गट खिळखिळा झाला आहे. प्रमुख नेते, पदाधिकारी आणि निवडणुकीवर प्रभाव पाडू शकणा-या कार्यकर्त्यांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आगामी लोकसभेला उमेदवारांची जमवाजमव करताना महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांना घाम फुटू लागला आहे. दुसरीकडे, अन्य पक्षांतील गर्दी वाढू लागल्याने निष्ठावंतांच्या मनधरणीचे आव्हान भाजपासमोर (BJP) उभे ठाकले आहे.

प्राप्त परिस्थितीत महायुतीकडे ३८, तर महाविकास आघाडीकडे (MVA) ८ खासदारांचे बळ आहे. युतीपैकी २३ भाजपाचे, १ शिंदे, १ अजित पवार गट आणि एक खासदार (नवनीत राणा) अपक्ष आहे. मविआकडील ८ पैकी उद्धव ठाकरे गटाकडे ५, तर शरद पवार यांच्याकडे ३ खासदार आहेत. काँग्रेसकडील एकमेव खासदाराचे (बाळू धानोरकर – चंद्रपूर) निधन झाल्यामुळे सध्या त्यांची पाटी कोरी आहे. त्यामुळे ८ खासदारांचे बळ असलेल्या महाविकास आघाडीला ४० उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. तेही महायुतीला टक्कर देणारे असायला हवेत, अन्यथा डिपॉझिट जप्तीची नामुष्की ओढवणार आहे. त्यामुळे काही आजी-माजी आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे नियोजन मविआकडून (MVA) केले जात आहे.

(हेही वाचा Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांची वाघनखं ब्रिटनमधून आणणार महाराष्ट्रात; सामाजिक कार्यकर्ते विनोद डिसुझा यांच्या प्रयत्नांना यश)

भाजपा विद्यमान मंत्र्यांना संधी देणार

  • महायुतीकडे ३८ खासदार असले, तरी त्यातील किती पुन्हा निवडून येतील, याची चाचपणी करण्यात आली आहे. त्यानुसार, भाजपाला (BJP) २५, शिवसेना १३ आणि अजित पवार गटाला १० जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या विद्यमान खासदारांच्या कामाचा आढावा घेतला असून, यात काही खासदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता नसल्याने त्यांचे तिकीट कापले जाणार आहे.
  • काही मतदारसंघात खासदारांनी आपला निधी पूर्ण वापरलेला नाही. लोकांशी संपर्कही कमी ठेवलेला आहे, तर काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदारांना तिकीट देण्यास विरोध केला आहे. अशा जागांवरील खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे.
  • काही ठिकाणी विद्यमान मंत्र्यांना रिंगणात उतरवले जाणार आहे. त्यात सुधीर मुनगंटीवार, भागवत कराड, गिरीश महाजन, नारायण राणे यांचा समावेश असल्याचे कळते. मुनगंटीवर यांनी चंद्रपूर, कराड यांनी संभाजीनगर, गिरीश महाजन जळगाव, तर नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणूक लढवावी, असा पक्ष नेतृत्वाचा आग्रह आहे.
  • २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये भाजपाने (BJP) अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, २०२४ मध्ये जागा घटणार असल्याचे त्यांनी पक्षांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. गेल्या सर्व निवडणुकांमध्ये अखंड शिवसेना भाजपासोबत होती. आता शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट भाजपसोबत (BJP) आहे. गेल्यावेळी भाजपाचे २३ खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते. आता महायुतीने ४८ च्या ४८ जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी शिंदे आणि अजित पवार गटाचा किती फायदा होईल, याचा अंदाज भाजपचे धुरीण घेत आहेत.

मविआकडून (MVA) ‘या’ जागांवर शोध सुरू

  • अहमदनगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • कल्याण
  • कोल्हापूर
  • चंद्रपूर
  • धुळे
  • नंदुरबार
  • नांदेड
  • नाशिक
  • पालघर
  • बीड
  • बुलढाणा
  • भंडारा-गोंदिया
  • भिवंडी
  • मावळ
  • मुंबई दक्षिण मध्य
  • रामटेक
  • लातूर
  • सांगली
  • हातकणंगले

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.