Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांची वाघनखं ब्रिटनमधून आणणार महाराष्ट्रात; सामाजिक कार्यकर्ते विनोद डिसुझा यांच्या प्रयत्नांना यश

विनोद डिसुझा यांनी ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जावीत, यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे तर थेट ब्रिटनपर्यंत मागील १३ वर्षे पत्रव्यवहार केला.

109

महाराष्ट्रातील शिवकालीन इतिहासातील अफझलखान वध हा शिवप्रतापातील शौर्याचे सुवर्ण पान समजले जाते. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी वापरलेली वाघनखं (Tiger claw) अनेक शतकांपासून ब्रिटनमध्ये आहेत. ती महाराष्ट्रात आणण्यासाठी बरेच प्रयत्न झाले आणि अपयश आल्याने प्रयत्न सोडून दिले गेले; पण याला अपवाद ठरले ते सामाजिक कार्यकर्ते विनोद डिसुझा. विनोद डिसुझा यांनी ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जावीत, यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे तर थेट ब्रिटनपर्यंत मागील १३ वर्षे पत्रव्यवहार केला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही विनोद डिसुझा यांनी पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले. ब्रिटनने ही वाघनखं महाराष्ट्रात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल डिसुझा यांचे सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे.

हेही पहा –

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार आणि वाघनखं (Tiger claw) भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता लवकरच म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्लंडला जाणार आहे. एका मुलाखतीती मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) लंडनमध्ये असलेली वाघनखं या वर्षीच महाराष्ट्रात येणार आहे. ब्रिटन सरकारकडून या संदर्भातील पत्र मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. लंडनमधील व्हिक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली आहेत. सगळ्या औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास या डिसेंबरपूर्वीच वाघनखं महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा Sada Saravankar : आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं, सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट)

यासंबंधी विनोद डिसुझा यांचे श्री शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पू. भिडे गुरुजी यांनीही अभिनंदन केले. तुमच्या पाठपुराव्याला हे मिळालेले यश आहे. त्याबद्दल तुम्हाला अनेक आशीर्वाद, तुमचे हे कार्य मोलाचे आहे, अशा शब्दांत पू. भिडे गुरुजी यांनी विनोद डिसुझा यांचे पुन्हा अभिनंदन केले. याविषयी ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलताना विनोद डिसुझा म्हणाले की, १३ वर्षे यासाठी मी प्रयत्न करत होतो, ब्रिटिशांच्या राजघराण्याला १०१ पत्रे पाठवली त्यांनी त्याची दखल घेतली, ब्रिटिश सरकारलाही पत्रे पाठवली होती,  ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी मला कळवले होते की, तुमचे प्रयत्न व्यक्तिगत स्वरूपात होते आहेत, जर तुमची मागणी तुमच्या सरकारच्या पातळीवर झाली तर त्याचा विचार केला जाईल. त्यामुळे आपण सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना आपण यासंबंधी केलेला सर्व पत्रव्यवहार दाखवला, त्यानंतर राज्य सरकारच्या पातळीवर ब्रिटन सरकारकडे पत्रव्यवहार झाला आणि त्याचे सकारात्मक परिणाम आले, असे डिसुझा म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.