एसटी संपकरी आक्रमक, अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ

102

राज्यात गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. गेले पाच महिने उलटल्यानंतरही अद्याप लालपरीची वाहतूक पूर्णतः सुरू झाली नसल्याचे एसटी प्रवाशी नाराजी दर्शवत आहेत. राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलनीकरण व्हावे, या एका प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील संपकरी एसटी कर्मचारी या संपावर ठाम आहेत. दरम्यान, आज, शुक्रवारी एसटी कर्मचारी आक्रमक होत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन केले, यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी निवासस्थानवर दगडफेकही केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर देखील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करून त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा आणखी वाढविल्याचे समोर आले आहे.

परबांच्या बंगल्याबाहेरील सुरक्षा वाढवली

संपकरी एसटी कामगारांनी शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानंतर आता एसटी कर्मचारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनिल परबांच्या अजिंक्यतारा या शासकीय बंगल्याबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दुपारी पावणे चार वाजल्याच्या सुमारास एसटीचे कर्मचारी अचानक शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी आंदोलनकांनी पवारांविरोधात निषेधार्थ घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. अचानक कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

(हेही वाचा – संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या निवासस्थानावर दगडफेक)

विश्वास नांगरे पाटीलांसह पोलिसांचा फौजफाटा तैनात

संतप्त आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर आंदोलन केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी संपकरी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर कर्मचाऱ्यांची संख्या असल्याने पोलिसांना त्यांच्यावर नियंत्रण राखता आले नाही. यावेळी आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्वर ओकवर तैनात झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झालेल्या दिसून आल्यात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.