संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या निवासस्थानावर दगडफेक

137

राज्यात गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. गेले पाच महिने उलटल्यानंतरही अद्याप लालपरीची वाहतूक पूर्णतः सुरू झाली नसल्याचे एसटी प्रवाशी नाराजी दर्शवत आहेत. राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलनीकरण व्हावे, या एका प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी राज्यातील विविध आगारातून अद्याप मुंबईतील आझाद मैदानात आपले ठाण मांडून आहे. तर आज, शुक्रवारी एसटी कर्मचारी आक्रमक होत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन केले, यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी निवासस्थानवर चप्पल फेक करत दगडफेकही केल्याचे पाहायला मिळाले.

पवारांच्या निषेधार्थ संपकऱ्यांची घोषणाबाजी

संतप्त आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर आंदोलन केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी संपकरी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घराच्या दिशेने चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर कर्मचाऱ्यांची संख्या असल्याने पोलिसांना त्यांच्यावर नियंत्रण राखता आले नाही. यावेळी आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्वर ओकमध्ये तैनात झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झालेल्या दिसून आल्यात. यावेळी त्यांनी पवारांविरोधात जोरदार निषेधार्थ घोषणाबाजी देखील केली.

२२ एप्रिलपर्यंत हजर होण्याचा अल्टिमेटम

एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीच्या मागण्याबाबत राज्य शासनाला आदेश दिले. या आदेशाने संपकरी कर्मचाऱ्यांनी मोठा जल्लोष केला. दरम्यान, जोपर्यंत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळत नाही तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणत्या तारखेला, किती वाजता एकाच वेळी निर्णय घेऊ, असे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.