
-
प्रतिनिधी
MSRTC : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील्स, शॉर्ट व्हिडिओ आणि लाइव्ह स्ट्रीमिंगचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत असताना, सरकारी कर्मचाऱ्यांच्या अशा कृतींवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शासकीय कर्तव्य बजावताना किंवा कार्यालयीन परिसरात सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने दिला आहे.
यापुढे एसटी आगार, बसस्थानक, कार्यालय किंवा एसटी बसमध्ये महामंडळाचा गणवेश परिधान करून कोणत्याही प्रकारचे रील, व्हिडिओ, युट्यूब शॉर्ट्स किंवा इतर सोशल मीडिया आशय तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महामंडळाची प्रतिमा मलिन होईल किंवा चुकीचा संदेश जाईल, अशा स्वरूपाच्या सामग्रीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात वरुणराजाचा जोर कायम; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा )
महामंडळाच्या प्रवासी सुविधा, विविध योजना, स्वच्छता मोहिमा किंवा जनजागृतीपर उपक्रमांबाबत व्हिडिओ तयार करायचा असल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानगीशिवाय तयार करण्यात आलेल्या कोणत्याही व्हिडिओवर शिस्तभंगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या हव्यासापोटी धोकादायक स्टंट करणाऱ्यांवरही कारवाईचा धडाका सुरू आहे. धावत्या लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंट करत त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करणाऱ्या २२ वर्षीय मोहम्मद कुरेशीला रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली. चौकशीत त्याने लाइक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा स्टंट केल्याची कबुली दिली असून, त्याच्यावर रेल्वे न्यायालयात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पनवेल आगारातील महिला वाहक नंदा कोळी यांनी एसटीच्या गणवेशात नियंत्रण कक्षात रील तयार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये पनवेलचे वाहतूक नियंत्रक विजय माने आणि सुनील देशमुख हेही सहभागी असल्याचे आढळले. फेसबुकवर या व्हिडिओला सुमारे ७ लाख ५१ हजार व्ह्यूज मिळाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. व्हिडिओची सत्यता पडताळल्यानंतर मुंबई विभागाने तिघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केले. यानंतर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी कर्तव्यावर असताना रील, व्हिडिओ, लाइव्ह स्ट्रीमिंग किंवा कोणत्याही सोशल मीडिया आशयाची निर्मिती करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
