Maharashtra Politics : महायुतीतील घडामोडींचा अन्वयार्थ काय ?

Maharashtra Politics : घटक पक्षाला संपवणे ही त्यांची प्रवृत्ती खरोखर एक दिवस भाजपाला संपवून टाकणारी ठरू नये, म्हणजे पावलं.

912

– सचिन धानजी

राज्यात सध्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे (Mahayuti) सरकार आहे. महायुती निवडणुकीत यशस्वीपणे लढली असली, तरी सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र एकमेकांच्या मंत्र्यांची आणि आमदारांची प्रकरणे, तसेच त्यांच्या बेताल वक्तव्यांवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. (Maharashtra Politics) त्यात सरकारमधील घटक पक्षांकडून विरोधी पक्षांना रसद पुरवली जात आहे, असं बोललं जातं. नाही म्हटले, तरी सरकारमधील घटक पक्षांच्या संबंधांवरून महायुतीबाबत लोकांच्या मनात तीव्र नाराजी आणि विशेषत: ही नाराजी भाजपाप्रतीच अधिक असल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचा – Vasai-Virar ला वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका, जाणून घ्या कुठे बांधणार नवे ७ उड्डाणपूल?)

हा अविर्भाव भाजपाकडून अपेक्षित नाही

राज्यात ज्या प्रकारे उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपासोबत युतीत निवडणूक लढवून नंतर सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सोयरीक साधून ज्या प्रकारे सरकार स्थापन केले, त्याचा बदला भाजपाने, एकनाथ शिंदे यांच्यासोबत ८ मंत्र्यांसह पक्षाचे ३९ आमदार आणि इतर अपक्ष ९ आमदारांना बंड करायला लावून शिवसेना पक्षात फूट पाडली. नव्हे तर शिवसेना पक्षावरच शिंदे यांनी दावा करत भाजपाने आपली सर्व ताकद लावून या पक्षाला चिन्ह आणि नाव मिळवून दिलं. मुळात याला भाजपाने पक्ष फोडला, असे म्हणणे चुकीचे आहे. जमिन जिथं भुसभुसीत असते, तिथंच खड्डा बनला जातो आणि शिंदेंसोबत जे ५० आमदार फुटले, ते फुटण्याच्या मार्गावर होते. त्यांना भाजपाने दिशा देत मार्ग दाखवला. असेच पुढील वर्षांत राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याबाबतीत घडवून आणले.

मित्रपक्षांच्या मंत्र्यांवरील आरोपांना भाजपाची रसद ?

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत ९ खासदार आणि ३९ आमदारांनी बंड केले आणि पक्षावर दावा केला. अजित पवार यांच्याही पक्षाला घड्याळ चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाले. याच पक्षाच्या आणि चिन्हाच्या जोरावर भाजपाने २०२४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. यामुळे केंद्रात मोदी यांचे सरकार विराजमान झाले आणि राज्यात देवेंद्र फडवणीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होतं, साकार होतं. तेव्हा आता यांची गरजच नाही, अशा अविर्भावात वागणं हे तरी मुख्य पक्ष असलेल्या भाजपाकडून अपेक्षित नाही. खरंतर आम्ही असं कुठे वागलो, असा प्रतीप्रश्न भाजपाकडून येणं अपेक्षितच आहे. पण हाच प्रश्न भाजपाने आपल्या मनाला विचारणं आणि त्यांचे उत्तर मिळवून घेण्याचा प्रयत्न केल्यास जनतेला काय वाटतं, हे कळेल.

आज शिवसेनेचे संजय गायकवाड मारहाण प्रकरण, संजय शिरसाट यांचे संभाजीनगरमधील हॉटेल लिलाव प्रकरणातील मुलाचा सहभाग आणि घरातील नोटांची बॅग असलेला व्हिडिओ, खासदार सांदिपान भुमरे यांच्या चालकांच्या नावावर खरेदी केलेली जमीन प्रकरण, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बारवरील धाड आणि हे प्रकरण समोर आणणं, तसेच भारत गोगावले आणि प्रताप सरनाईक आदी मंत्र्यांच्या विरोधात ज्या प्रकारे विरोधकांना रसद पुरवून त्यांना आरोप करायला लावण्याचा जो प्रयत्न केला जातो, तो लोकांना न समजण्यासारखा नाही.

हे झालं शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांच्या बाबतीत. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही तेच होतंय. माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. सभागृहात अशा प्रकारच्या खेळण्याचे कुणीच समर्थन करणार नाही, पण अशा सभागृहात याचा व्हिडिओ काढला जातो, हाच संशोधनाचा मुद्दा आहे. सत्ताधारी पक्षाच्या सहकार्याशिवाय असा व्हिडिओ काढणंच अशक्य आहे. येणाऱ्या तपास मोहिमेतून ते समोर येईलच. यापूर्वी धनंजय मुंडे यांना अशा प्रकारे विरोधकांकडून आरोप करायला लावून राजीनामा द्यायाला भाग पाडला गेला. मागील अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये आणि आताच्या जवळपास दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये भाजपाच्या एका तरी आमदार आणि खासदारांवर विरोधकांनी आरोप करून त्यांना भंडावून सोडलं, असं काही पहायला मिळालं नाही.

घटक पक्षाला संपण्याची प्रवृत्ती आत्मघात ठरेल !

आधी भाजपाने दोन्ही पक्ष फोडण्यास पूर्ण मदत केली आणि आता भाजपा दोन्ही पक्षाला भिडवून देत त्या दोघांना संपवण्याचा प्रयत्न करतंय, असा समज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. सावली बारचा परवाना मंत्र्यांच्या आईच्या नावे आहे, याची माहिती अनिल परबांपर्यंत कशी पोहोचली केली आणि त्यावर धाड कशी मारली गेली, हे जनतेला न समजणारे नाही. एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पाहून ते मोठे कलाकार आहेत, असं सांगितलं होतं. त्यांची ही कलाकारी आता शिंदे आणि पवार यांच्या लक्षात येत असेल, पण घटक पक्षाला संपवणे ही त्यांची प्रवृत्ती खरोखर एक दिवस भाजपाला संपवून टाकणारी ठरू नये, म्हणजे पावलं.

जून २०२२ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करायला लावले, तेव्हापासून ठाकरे यांनी फडणवीस आणि भाजपावर सातत्याने टीका केली. भाजपावर विश्वास ठेवण्यासारखा नाही. तोडा, फोडा आणि राज्य करा हीच भाजपाची निती असल्याचा आरोप केला होता. भाजपाचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी कायमच भ्रष्ट जनता पार्टी असा केला होता. पण आज तेच उद्धव ठाकरे हे फडणवीस यांना वारंवार भेटत आहे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचीही भेट होत आहे. म्हणजे आजही फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यात मैत्रीचा ओलावा असून सध्या तो काही पाझरतानाही दिसू लागला आहे. याच मैत्रीपोटी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत एकहाती ८२ नगरसेवक निवडून आणून तसेच सत्ता स्थापन करण्याची पूर्ण संधी असतानाही पहारेकरी बनून राहण्याचा निर्णय घेतला. ती पाच वर्षे उद्धव ठाकरेंच्या हाती एकहाती महापालिका दिली गेली आणि भाजपाच्या नगरसेवकांना पाच वर्षे भिकारी बनवून ठेवले गेले होते. महापालिकेत पाचही वर्षे भाजपाला नगरसेवकांना निधी मिळाला नाही, तो निधी मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागलं होतं.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदार अडचणीत आणले जात असताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) हे ठाकरेंच्या भेटी घेत आहेत, देत आहेत. मग मागील अडीच वर्षांत ठाकरेंनी अशा किती भेटी घेतल्या होत्या. आताच का ठाकरेंना भेटी घ्याव्याशा वाटतात, कारण इथंच पाणी मुरतंय.

फडणवीसांनी कुटुंबप्रमुख व्हावे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही एकत्र लढणार हे सत्य आहे. पण त्या निवडणुकीपूर्वी बारगेनिंग पॉवर दाखवण्यासाठी दोन्ही पक्षाचे कमकुवत दुवे हेरून जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा डाव असेल, तर राजकीय कुटनितीचा डाव आहे. हे शिवसेना असो वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो हे सत्तेसाठी महायुतीसोबत आले नाहीत, तर आपल्या भविष्यातील राजकीय अस्तित्वासाठी एकत्र आले आहेत. सत्तेसाठी भाजपाने यांना पक्षात बंड करायला लावलं. जशी गरज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे तशीच गरज भाजपालाही आहे. त्यामुळे मोठा पक्ष म्हणून या दोन्ही पक्षांना सामावून घेतानाच सांभाळून घेणंही तेवढंच गरजेचं आहे. नव्हे तर विरोधकांना त्यांच्या विरोधात आक्रमक करणे. जो पक्ष आपण फोडला, तो पक्ष आपल्याला शिव्या देत होता आणि तोच पक्ष आणि त्यांचे नेते आपल्याला सोडून आपल्याच घटक पक्षावर टीका करायला लागले, तर त्यातून काय बोध घ्यायचा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना बाजूला करून मूळ पक्ष आणि चिन्ह मिळवून देण्याचा जर प्रयत्न झाला असेल, तर ते दोन्ही पक्ष आपल्यासोबत पुढेही गुण्यागोविंदाने रहावे, यासाठी कुटुंबप्रमुख या नात्याने फडणवीस यांच्याकडून प्रयत्न व्हायला हवा. शिवसेना फुटल्यानंतर २५ वर्षे युतीसोबत राहणाऱ्या भाजपाबद्दल उध्दव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी जे आरोप आणि टिका केली, ते तेवढे मनावर घेतले गेले नाही. भविष्यात असंच चित्र शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्याबाबतीत घडल्यास भाजपाला जनता माफ करणार नाही. उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप व टीका योग्यच असून भाजपा केवळ कामापुरती आणि स्वार्थापोटी वापरून घेत मग त्यांना फेकून देते अशा प्रकारची भावना निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. असं घडल्यास मुंबईसह राज्यात आणि देशातही सूज्ञ मतदार जो भाजपासोबत आहे, तो सोबत राहणार नाही. मतदारांसोबत जनतेचाही विश्वास जिंकणं, हे भाजपासाठी मोठं आव्हान आहे. उबाठा शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं तेच जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबाबतीत घडवून आणण्याचा विचार असेल, तर तो डोक्यातून काढून टाकायला हवा. ज्या पक्षाला आपण बळ दिलं, ते तरी प्रादेशिक पक्ष जिवंत ठेवा म्हणजे तुमच्यावर जनता विश्वास ठेवेल.

भाजपाने शिंदे गटासोबत केलेल्या वचनबद्धतेत कसूर केली किंवा त्यांना योग्य वागणूक दिली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील आणि महाराष्ट्रातून भाजपाचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. भाजपाने शिंदे गटासोबत ‘दगाफटका’ केला, म्हणजे त्यांना दिलेले शब्द पाळले नाहीत किंवा त्यांना अपेक्षित सन्मान दिला नाही, तर त्याचे परिणाम भाजपासाठी अत्यंत गंभीर असू शकतात. महाराष्ट्रासारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्यात असं काही घडल्यास, भाजपा आपले जनमत गमावू शकते आणि याचा दूरगामी परिणाम पक्षावर होईल, हे सांगण्यासाठी ज्योतिष्यवेत्याची गरज नाही. तूर्तास एवढंच! (Maharashtra Politics)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.