राजकीय अस्थिरतेत २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

80

शिवसेनेतील ४० आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून टाकल्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. गुरुवारी, ३० जून रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी सरकार कोसळणार, अशी स्थिती निर्माण झाली असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. आयोगाने त्यानुसार परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार ५ जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. ४ ऑगस्ट रोजी मतदान आणि ५ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात नव्या सरकारच्या नेतृत्वाखाली राजकीय आखाडा रंगणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

(हेही वाचा बहुमत चाचणीच्या आधीच महाविकास आघाडीत फूट?)

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3) मधील कलम 10 अ पोटकलम (4) मधील अधिकारांचा वापर करत राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात यावी, असेही निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. या निवडणुकीदरम्यान कोरोना नियमांचे पालन करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम 

  • 5 जुलै 2022 – तहसिलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे
  • 12 जुलै ते 19 जुलै 2022, सकाळी 11 ते दुपारी 3 – नामनिर्देशनपत्रे मागवणे
  • 20 जुलै 2022 – नामनिर्देशनपत्र छाननी करणे
  • 22 जुलै 2022 – नामनिर्देशनपत्र मागे घेणे
  • 22 जुलै 2022 (दुपारी तीन नंतर) – निवडणूक चिन्ह नेमून देणे, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे
  • 4 ऑगस्ट 2022 – आवश्यक असल्यास मतदान 5 ऑगस्ट 2022 – मतमोजणी व निकाल घोषित करणे

या जिल्ह्यात होणार निवडणुका 

नाशिक – 40, धुळे – 52, जळगाव – 24, अहमदनगर – 15, पुणे – 19, सोलापूर – 25, सातारा – 10, सांगली – 1, औरंगाबाद 16, जालना – 28, बीड – 13, लातूर -9, उस्मनाबाद – 11, परभणी – 3, बुलढाणा – 5.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.