Public Ganeshotsav 2024 : मूर्तीकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा

मूर्तीकारांनी मंडपाकरिता अर्ज सादर करतांना मागील सलग तीन वर्षांच्या परवानगीच्या प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

412
Public Ganeshotsav 2024 : मूर्तीकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा

मुंबईसारख्या महानगरात सण-उत्सव साजरे करतांना निसर्गचक्रास कोणतीही बाधा होणार नाही याची खबरदारी घेत यंदाचा गणेशोत्सव २०२४ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी श्रीगणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार) देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी मूर्तीकारांना देण्यात आलेली परवानगी नवरात्रोत्सवापर्यंत कायम राहणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. याशिवाय मूर्तीकारांसाठी एक खिडकी योजनाही राबविण्यात येणार आहे. (Public Ganeshotsav 2024)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले जातात. यंदाचा गणेशोत्सव २०२४ देखील पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. गणेशोत्सव-२०२४ साजरा करण्यासंदर्भात मूर्तीकारांसाठी महानगरपालिकेच्यावतीने मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली. मूर्तीकार मंडप परवानगीची कार्यवाही विभागस्तरावर एक खिडकी योजनेद्वारे राबविण्यात येणार आहे. (Public Ganeshotsav 2024)

गणेशोत्सव २०२४ सुरळीत पार पडावा यासाठी उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार आंबी, सहायक आयुक्त (के पूर्व) मनिष वळंजू, सहायक आयुक्त (एन) गजानन बेल्हाळे यांचा समावेश आहे. (Public Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांची पहिली सभा नारायण राणेंसाठी)

मंडप परवानगीची प्रक्रिया सुटसुटीत

मूर्तीकारांनी मंडपाकरिता अर्ज सादर करतांना मागील सलग तीन वर्षांच्या परवानगीच्या प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरच मंडपासाठी परवानगी देण्यात येईल. मूर्तीकारांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ज्यांच्याकडे सलग तीन वर्षांच्या परवानगी असतील त्यांनी यंदा नव्याने स्थानिक पोलिस व वाहतूक विभाग यांच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. (Public Ganeshotsav 2024)

परंतु, मागील तीन वर्षांपैकी कोणतीही एक परवानगी नसल्यास संबंधित मूर्तीकारांना स्थानिक पोलिस, वाहतूक विभागाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे बंधनकारक असेल. याशिवाय सार्वजनिक जागेवर मूर्तीकारांकडून मंडपासाठी नव्याने अर्ज आल्यास विभागीय कार्यालयाकडून त्याबाबत तपासणी करण्यात येईल. स्थानिक पोलिस स्थानक, वाहतूक विभागाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त झाल्यानंतर मूर्तीकारांना मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे. (Public Ganeshotsav 2024)

मंडपांसाठी कोणतेही शुल्क नाही

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवरील मंडपासाठी, खासगी जमीन मालकाच्या परवानगीने उभारावयाच्या मंडपासाठी यंदा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय प्रत्येक मंडपासाठी देखील अनामत रक्कम आकारली जाणार नाही. परंतु खासगी जागेवर मंडपासाठी परवानगी मागणारे मूर्तीकार हे पारंपरिक मूर्तीकार असणे अनिवार्य आहे. अशा मूर्तीकारांना शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांपैकी कोणत्याही एकाच ठिकाणी परवानगी घेता येईल. (Public Ganeshotsav 2024)

गतवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विभागस्तर उपलब्ध असलेली जागा ‘प्रथम अर्जदारास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येईल. मात्र यासाठी अर्जदार स्वत: मूर्तीकार असणे अनिवार्य आहे. तसेच सदर जागेवर मूर्तीकारांना सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (Public Ganeshotsav 2024)

प्रति परिमंडळ १०० टन विनामूल्य शाडू माती 

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता मूर्तीकारांना विनामूल्य शाडू माती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिमंडळीय स्तरावर उप आयुक्त यांनी ठरविलेल्या एका विभागात सुयोग्य जागा निवडून प्रति परिमंडळ १०० टन शाडू माती मूर्तीकारांना विनामूल्य उपलब्ध करून देतील. वाढीव मागणी प्राप्त झाल्यास उप आयुक्त आपल्या स्तरावर वाढीव शाडू माती खरेदी करू शकतील. मूर्तीकाराचे घर किंवा मूर्ती बनविण्याच्या जागा प्रकल्पबाधित झाल्यास अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या मूर्तीकारास नवीन ठिकाणी पूर्वी इतक्या क्षेत्रफळाची परवानगी नव्याने अर्ज प्राप्त झाल्याप्रमाणे देण्यात येईल. (Public Ganeshotsav 2024)

(हेही वाचा – Rahul Shewale : राहुल शेवाळेंनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन)

…अन्यथा महानगरपालिका आकारणार दंड

मूर्तिकारांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते/फूटपाथवर खड्डे खणल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मूर्तीकारांसाठी मंडपाची परवानगी देताना ही परवानगी केवळ मूर्तीकारांसाठी असेल व परवानगीचा उपयोग मूर्तीविक्रीकरिता केला जाणार नाही, असे स्वयंघोषित हमीपत्र मूर्तीकारांना महानगरपालिकेकडे सादर करणे बंधनकारक आहे. (Public Ganeshotsav 2024)

मूर्तीकारांना नवरात्रीपर्यंत नि:शुल्क जागा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे मूर्तीकारांनी पालन करणे आवश्यक आहे. तसेच सदर सूचना नवरात्र व अन्य उत्सवांकरिताच्या मूर्तीकारांसाठीही लागू राहतील. मूर्तीकारांना आवश्यकतेनुसार मंडप उभारणीसाठी दिलेली परवानगी नवरात्री उत्सवापर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच मूर्तीकाराने मंडपाच्या परवानगीकरिता अर्ज करताना परिशिष्ट १ (मूर्तीकारांचे हमीपत्राचा विहित नमुना), परिशिष्ट २ (अग्नीसुरक्षेबाबत हमीपत्राचा विहित नमुना) सादर करणे बंधनकारक राहील, असे उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी कळविले आहे. (Public Ganeshotsav 2024)

संसर्गजन्य आजारांचा (उदा. कोविड-१९ इत्यादी) प्रसार रोखण्याकरिता शासनाच्या निर्देशांचे पालन करणे मूर्तीकारांना बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या तांत्रिक समितीच्या निर्देशानुसार कोकोपीट, शाडूमाती, भाताच्या काड्या व त्यावर मातीच्या लेपाचा वापर हा प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय असल्याचे समोर आले आहे. वर नमूद केलेल्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून मूर्ती घडविण्याबाबत मूर्तीकारांना सूचविण्यात आले आहे. उत्सवादरम्यान मूर्तीचे आगमन/विसर्जन सुकर होईल व स्थापनेदरम्यान मूर्तींचे स्वैर्य अभंग राहिल एवढ्या उंचीची मूर्ती घडविण्यात यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून आहे. (Public Ganeshotsav 2024)

मूर्तीकार, मंडळांना महानगरपालिकेचे आवाहन

मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांना मूर्तीकार आणि श्री गणेश मंडळे देखील दरवर्षी प्रतिसाद देतात. यंदाच्या गणेशोत्सवासाठी देखील महानगरपालिका प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. पर्यावरणपूरक उत्सवासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध कामे आतापासूनच हाती घेतली आहेत. मूर्तीकार, श्री गणेश मंडळांनी देखील हा उत्सव अधिकाधिक सुटसुटीत आणि आनंदात साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा महानगरपालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Public Ganeshotsav 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.