वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये जाण्याला कोण जबाबदार? मुख्यमंत्री आणि कंपनीमधील पत्रव्यवहार आला समोर

124

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा आणि 1 लाखाहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येत असतानाच शिंदे-फडणवीस सरकारकडूनही विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वेदांता कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांच्यात पत्रव्यवहार झाला असल्याचे समोर येत असून, त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनाच सवाल केला आहे. इतकी मोठी कंपनी आपला इतका मोठा प्रकल्प उभारण्याचा निर्णय केवळ दोन महिन्यांत घेऊ शकते का, असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री आणि वेदांतामध्ये पत्रव्यवहार

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेदांता कंपनीने पत्र लिहित राज्य सरकारने या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा पाठिंबा मिळवावा, अशी मागणी कंपनीने केली होती. या पत्राला मुख्यमंत्री शिंदे यांनी 26 जुलै रोजी उत्तर देत आपण केंद्र सरकारचा पाठिंबा मिळवू, असे आश्वासन त्यांनी वेदांता कंपनीला दिले होते. तसेच कंपनीच्या ज्या काही मागण्या आहेत त्याची पूर्तता देखील राज्य सरकारकडून करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले होते. 29 जुलै रोजी आपण कंपनीसोबत सामंजस्य करार करू, असेही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले होते.

(हेही वाचाः नवी मुंबईत राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांचा धक्का, माजी नगरसेवकांसह तालुकाध्यक्ष शिंदे गटात)

मुख्यमंत्र्यांचा दावा

केंद्र सरकारच्या दबावामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याची टीका विरोधक करत आहेत. पण यावरुनच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. आमचे सरकार सत्तेत येऊन केवळ दोनच महिने झाले आहेत. पण गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारकडून या प्रकल्पासाठी कंपनीला योग्य तो प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे केवळ दोन महिन्यांत इतकी मोठी गुंतवणूक करणारी कंपनी आपला निर्णय बदलू शकते का?, प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा त्यांचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.