मलबार हिलमधील बंगल्यांच्या वाटपातही भाजपचे पारडे जड

91

राज्याचे मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मिळाले असले, तरी वजनदार खाती आपल्याकडे ठेवण्यात भाजपला यश आले आहे. त्यापाठोपाठ आता मलबार हिलमधील बंगल्यांच्या वाटपातही भाजपचे पारडे जड दिसत असून, बहुतांश वरिष्ठ मंत्र्यांना त्यांच्या पसंतीचे बंगले देण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मलबार हिलसाठी मंत्री प्रयत्नशील

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना विहित कार्यकाळासाठी शासकीय बंगला दिला जातो. मुख्यमंत्र्यांसाठी त्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान म्हणून वर्षा बंगला राखीव ठेवण्याची प्रथा आपल्याकडे आहे. मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांना मलबार हिलमधील बंगले तर अन्य मंत्र्यांना मंत्रालयासमोरची निवासस्थाने दिली जातात. मलबार हिलमधील बहुतांश बंगले हे समुद्र किनाऱ्याला लागून असून, आकाराने मोठे आहेत. शिवाय त्यांची रचनाही प्रशस्त अशी आहे. याऊलट मंत्रालयासमोरचे बंगले तुलनेने लहान असल्याने मलबार हिलमध्ये बंगला मिळावा यासाठी राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री प्रयत्नशील असतात.

(हेही वाचाः भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा कोण? शलाका साळवी, अक्षता तेंडुलकर यांची नावे चर्चेत)

कोणाला कोणता बंगला?

मंत्रीपदांचा सर्वाधिक वाटेकरी असलेल्या भाजपच्या वाट्याला मलबार हिलमधील सर्वाधिक बंगले आले असून, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ‘रॉयल स्टोन’, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना ‘सेवासदन’ निवासस्थान देण्यात आले आहे. भाजपमधील ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘पर्णकुटी’ हा बंगला मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना ‘सागर’ बंगल्यात रहायचे. तो बंगला त्यांच्याकडे कायम असून, शेजारचा ‘मेघदूत’ बंगलाही त्यांना देण्यात आला आहे.

केसरकर ‘वर्षा’चे शेजारी

शिंदे गटाची बाजू माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडणाऱ्या शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ शेजारचा `शिवनेरी` हा बंगला देण्यात आला आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडील देवगिरी हे निवासस्थान कायम ठेवण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्री त्यांना मिळालेल्या निवासस्थानी रहायला जातील. उर्वरित मंत्र्यांना लवकरच बंगले दिले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

(हेही वाचाः ‘किक कशी मारायची हे शेलारांना बरोबर माहीत आहे’, फडणवीसांचा शिवसेनेला टोला)

भुजबळ, खडसेंमुळे चर्चेत आलेला बंगला कुणाला?

वर्षानंतर `रामटेक` हा सर्वाधिक प्रशस्त बंगला मानला जातो. त्यामुळे सर्वसाधारणपणे मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला तो देण्याची प्रथा आहे. पण `रामटेक`मध्ये असताना माजी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या पाठोपाठ एकनाथ खडसे यांच्या मागे शुक्लकाष्ट लागल्यामुळे हा बंगला घेण्यास बरेच जण धजावत नाहीत. भुजबळ १९९९ ते २०१४ पर्यंत या बंगल्यात वास्तव्यास होते, त्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले. एकनाथ खडसे यांना २०१४ मध्ये हा बंगला मिळाला. पुढे त्यांनाही पद सोडावे लागले होते. मात्र, अंधश्रद्धेला न जुमानता कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी हा बंगला स्वीकारला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.