भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा कोण? शलाका साळवी, अक्षता तेंडुलकर यांची नावे चर्चेत

98

भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची खांदेपालट करत पुन्हा एकदा महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक तथा जहाल भूमिका मांडणाऱ्या आमदार आशिषि शेलार यांच्यावर पुन्हा मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाबरोबर भाजपच्या मुंबई महिला मोर्चा अध्यक्षपदाची खांदेपालट केली जाणार आहे. विद्यमान भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल गंभीर यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी आशिष शेलार यांच्या चालीने चालणाऱ्या नवीन महिला पदाधिकाऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या पदासाठी महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा शलाका साळवी यांचे नावही पुन्हा चर्चेत असून त्यासोबतच दादर-माहिममधील भाजपच्या विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकली जाते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष असलेल्या आमदार मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपदी बढती देऊन त्या रिक्त जागेवर आमदार आणि भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोढा हे मवाळ भूमिकेचे असल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये एकप्रकारे मरगळ पसरली होती. परंतु आशिष शेलार यांची नियुक्ती केल्यानंतर एकप्रकारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. एकप्रकारे नवचैतन्य त्यांच्या अंगी संचारले आणि महापालिका निवडणुकीच्या कामाला लागले.

कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

मुंबईच्या भाजप अध्यक्षपदी शेलार यांची नियुक्ती झाल्यानंतर भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला मोर्चा अध्यक्षा शीतल गंभीर यांना बाजूला करून त्यांना आता आपल्या प्रभागात अधिक लक्ष घालण्यास मोकळे केले जाईल,असे बोलले जात आहे. गंभीर यांना बाजूला केल्यास त्या जागी नवीन अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची याची जुळवाजुळवी सुरु आहे. यासाठी माजी अध्यक्षा शलाका साळवी आणि दादरमधील भाजपच्या विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांची नावे चर्चेत आहेत.

नगरसेविकांना लांब ठेवणार

काही दिवसांपूर्वी मोर्चाच्या सरचिटणीसपदी माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांची नियुक्ती केली गेली. परंतु शिरवडकर यांनाही या पदापासून बाजूला करून त्यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून वॉर्डात लक्ष घालण्यास भाग पाडले जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१७च्या निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविकांना महिला मोर्चाच्या जबाबदारीपासून लांब ठेवले जाणार आहे. त्याऐवजी माजी नगरसेविका असलेल्या पदाधिकाऱ्यांवर पक्षबांधणीची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

कोण आहेत साळवी आणि तेंडुलकर?

शलाका साळवी यांनी शेलार हे भाजपचे मुंबई अध्यक्ष असताना महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे शेलार आणि साळवी यांचे ट्यूनिंग चांगले जमल्याने २०१७च्या निवडणुकी चांगले यश भाजपला मिळवून दिले होते. परंतु साळवी यांच्यानंतर अक्षता तेंडुलकर यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेना भवनबाहेर शिवसैनिकांना नडणाऱ्या आणि कायम शिवसेनेला शिंगावर घेणाऱ्या अक्षता तेंडुलकर यांचा आक्रमक स्वभाव हा महिला मोर्चा अध्यक्षपदासाठी योग्य असल्याने त्यांच्याही नावाचा विचार होण्याची शक्यता आहे,असे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.