Veer Savarkar : गांधी हत्येच्या कथित आरोपामुळे हिंदुत्ववादी संघटना ६० वर्षे मागे गेल्या – रणजित सावरकर  

२०१४ साली आपण हिंदुत्ववादी स्वबळावर सत्तेत आलो. खरेतर १९५२ सालीच आपण सत्तेवर यायला हवे होतो, जर तसे झाले असते, तर २०१४ नंतर केवळ १० वर्षांत भारतात जे परिवर्तन झाले, ते १९६२ सालीच झाले असते. तेव्हा आपण चीनलाही धूळ चारली असती, पण गांधी हत्येच्या नावाखाली हिंदुत्ववादी शक्तींना संपवण्याचे जे षडयंत्र होते, त्यात हिंदुत्ववाद्यांची ६० वर्षे वाया गेली, असे रणजित सावरकर यावेळी म्हणाले.

565

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्या शुभ हस्ते मुलुंड-ऐरोली जंक्शन येथे १० फेब्रुवारी रोजी, सकाळी १० वाजता वीर सावरकर यांच्या भव्य स्मारकाचे उदघाटन झाले. त्याठिकाणी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. भाजपचे स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांच्या संकल्पनेतून या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात आमदार मिहिर कोटेचा यांच्यासह महापालिका वॉर्ड अधिकारी अजय पाटणे आणि विभागाचे पोलीस अधिकारी एसीपी दळवी हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

मुलुंड-ऐरोली जंक्शन येथे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र यांचे नाव असलेला चौक आणि त्यांची प्रतिकृती आहे. बाजूला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे, जो या कार्यक्रमाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. समोर राजमाता अहिल्याबाई यांचे स्मारक आहे. अशा ठिकाणी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे. आजच्या दिवसाचा योगायोग वेगळा आहे. कारण आजच्या दिवशी वीर सावरकर यांची गांधी हत्येच्या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली होती. त्यानंतर भारताचा इतिहास बदलला. तेव्हा हिंदू महासभा राष्ट्रीय पक्ष होता, त्या पक्षाने देशपातळीवर १६ टक्के मते मिळवली होती. गांधी हत्येत हिंदुत्ववाद्यांना अडकवण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटना ६० वर्षे मागे गेल्या, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर म्हणाले.

(हेही वाचा : Veer Savarkar : ‘१० फेब्रुवारी’ वीर सावरकर यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना)

१९५२ सालीच देशात हिंदुत्ववादी सत्तेत यायला हवे होते

मध्यतंरी अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले होते, पण ते स्वबळावर नव्हते. २०१४ साली आपण स्वबळावर सत्तेत आलो. खरेतर आपण १९५२ सालीच सत्तेवर यायला हवे होते. जर तेव्हा १९५२ साली हिंदुत्ववादी शक्ती सत्तेत आल्या असत्या, तर जे २०१४ नंतर केवळ १० वर्षांत भारतात परिवर्तन झाले आहे, ते १९६२ सालीच झाले असते. तेव्हा आपण चीनलाही धूळ चारली असती, पण जे गांधी हत्येच्या नावाखाली हिंदुत्ववादी शक्तींना संपवण्याचे जे षडयंत्र होते, त्यात आपली ६० वर्षे वाया गेली आहेत. आजचा जो दिवस आहे तो या षडयंत्रातून बाहेर येण्याचा पहिला दिवस आहे. १० फेब्रुवारी १९४९ या दिवशी वीर सावरकर यांची गांधी हत्येच्या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली होती. त्याला ७५ वर्षे झाली आहेत, असेही सावरकर म्हणाले.

शस्त्रावर धर्माचा अंकुश हवा 

त्याकाळात कुणालाही वाटले नव्हते कि वीर सावरकर (Veer Savarkar) यांचे पुतळे उभारले जातील. ज्या क्षणी देश राम विसरेल त्याक्षणी देशाचा प्राण रहाणार नाही, असे वीर सावरकर यांनी सांगितले होते. लक्षात घ्या ५०० वर्षांपूर्वी जेव्हा श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी जे श्रीरामाचे मंदिर पाडण्यात आले, तो सगळ्यात मोठा हिंदूंवर प्रहार होता. आपण आत्मविश्वास, स्वाभिमान गमावला होता. ५०० वर्षे आपल्या संत, सैनिकांनी बलिदान दिले. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली, त्या सोहळ्यात मी प्रत्यक्ष सहभागी होतो, देशभर उत्साह होता, अभिमान जागा झाला होता. कारण ५०० वर्षांपासूनचा कलंक आपण मिटवला होता, पण तेवढ्यावर थांबून चालणार नाही. कारण वीर सावरकरांचे एक मत होते, जर शस्त्रावर धर्माचा अंकुश नसेल तर शस्त्र पाशवी बनते, ही पाशवी शस्त्रे आपण परकीय आक्रमकांची पाहिली आहेत. आजही ते आक्रमण करत आहेत. ती शस्त्रे जर आमच्या हातात हवी असतील, तर त्यावर धर्माचा अंकुश हवा, असेही रणजित सावरकर म्हणाले.

(हेही वाचा : Veer Savarkar : सवंग प्रसिद्धीसाठी सावरकरांवर टीका; जनता काँग्रेसला पुढच्याही निवडणुकांमध्ये धडा शिकवेल; रणजित सावरकरांचा हल्लाबोल)

जोवर सावरकरांचे विचार घेणार नाही तोवर देशाला भवितव्य नाही!

पंतप्रधान मोदी यांनी भारताची शक्ती काय आहे, हे दाखवून दिले आहे. आज भारताचे सैन्यदल जगातील शक्तिशाली सैन्यदल आहे, पण तिथे धर्म नव्हता, तो २२ जानेवारी २०२४ रोजी आला. त्या दिवशी प्रभू रामचंद्र आले आणि धर्म आणि शस्त्र यांची एकत्रित शक्ती आपल्या राष्ट्राच्या मागे उभी राहिली. वीर सावरकर यांचे पुतळे उभे होणे हे त्यांना कधीच अपेक्षित नव्हते, प्रेरणा त्यांच्या विचारातून घ्यावी, वीर सावरकरांचे (Veer Savarkar) विचार जोवर आपण घेत नाही तोवर आपल्या देशाला भवितव्य नाही. आणि त्यांचे विचार हेच सांगतात की, जोपर्यंत तुमच्या हातात शस्त्र आणि शास्त्र आहे तोपर्यंत शत्रू तुम्हाला काही करू शकत नाही. ही सुरुवात आहे, हे आपल्याला टिकवून ठेवायचे आहे. आज तुमचे एकच शस्त्र आहे, एक बोट दाबून २०२४ च्या निवडणुकीत मतदान करणे, जो हिंदू हित कि बात करेगा वही देश पे राज करेगा हे सरकार जर टिकले तर आपल्याला भवितव्य आहे. तरच २०४७ ला १९४७च्या फाळणीची पुनरावृत्ती होणार नाही, असे रणजित सावरकर म्हणाले.

यावेळी आमदार मिहीर कोटेचा म्हणाले, लाखो लोक अंदमानात जातात आणि तिथे वीर सावरकर यांची कोठडी पाहतात तेव्हा डोळ्यांत पाणी येते, त्याचबरोबर वीर सावरकर यांच्या संघर्षाची गाथाही आपल्या डोळ्यासमोर येते. याठिकाणी आपण २२ जानेवारीला राममंदिराच्या प्रतिकृती उभारली आणि आता हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले हे कार्य आपल्यासाठी भाग्याचे होते. हे स्मारक हजारो तरुणांना प्रेरणा देणार आहे, असे आमदार कोटेचा म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.