किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश, हायअलर्ट जारी – फडणवीस

94

१८ ऑगस्ट रोजी रायगडच्या हरिहरेश्वर किनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली त्या बोटीमध्ये तीन ए.के. रायफल्स आणि दारुगोळा तसेच, बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश, हायअलर्ट जारी

याबाबत तात्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव “लेडीहान” असून तिची मालकी ऑस्टेलियन नागरिक हाना लॉर्डरगन या महिलेची आहे. तिचा पती जेम्स हॉबर्ट हा या बोटीचा कॅप्टन असून, ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. २६ जून रोजी सकाळी १० च्या सुमारास बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला.

( हेही वाचा : महाराष्ट्रात घातपाताचा प्रयत्न; श्रीवर्धनमध्ये सापडल्या संशयास्पद बोटी, AK-47 सापडल्याने खळबळ)

दुपारी १ वाजता एका कोरिअन युद्ध नौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केले. समुद्र खवळलेला असल्याने “लेडीहान” या बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागलेली आहे अशी माहिती भारतीय कोस्ट गार्ड कडून प्राप्त झालेली आहे.

या घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोघेही मिळून करीत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्था यांचेशी सतत संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.