- विशेष प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या वादग्रस्त उल्लेखावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या प्रकरणात भाजपाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. महिलांचा अपमान करणाऱ्या वक्तव्याचे समर्थन करणे हे निषेधार्ह असल्याचे सांगत त्यांनी राऊतांवर अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला.
पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसच्या (Congress) टीकेचे समर्थन करताना संजय राऊत यांनी महिलांच्या सन्मानाचा विचार केला नाही. एका महिलेविषयी अशा प्रकारचे वक्तव्य योग्य ठरविणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी राऊतांवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांच्यावरही टीकेची झोड उठवत, वेगवेगळ्या प्रसंगी विरोधकांबाबत घेतलेल्या भूमिकांचा उल्लेख केला. कंगना रणौत प्रकरण, नारायण राणे यांच्यावरील भूमिका, मोहित कंबोज प्रकरण तसेच पत्रकार निखिल वागळे यांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा संदर्भ देत, त्या घटनांवेळी व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाहीची भूमिका कुठे होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
(हेही वाचा – RBI MCP Meeting : आरबीआय दर स्थिर ठेवणार का? ऑगस्ट पतधोरण बैठकीकडे लक्ष)
नवनाथ बन यांनी पुढे दावा केला की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सातत्याने जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवत आहेत. याउलट विरोधकांकडून केवळ आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका करत, भाजपा आणि शिवसेनेची पूर्वीची युती ही हिंदुत्वाच्या समान विचारांवर आधारित होती, असा दावा केला. सध्याच्या राजकीय भूमिकेमुळे उद्धव ठाकरे गट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेल्याची टीकाही त्यांनी केली.
याशिवाय, महिलांच्या सन्मानाबाबत भूमिका मांडणाऱ्या संजय राऊत यांनी पूर्वी विविध प्रसंगी वापरलेल्या भाषेचाही उल्लेख करत, सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी संयमित आणि सुसंस्कृत भाषा वापरणे आवश्यक असल्याचे नवनाथ बन यांनी सांगितले.
दरम्यान, ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच असून, या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

