गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले जतन, संवर्धन व व्यवस्थापनासंबंधी बैठक झाली.

187
गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न - सुधीर मुनगंटीवार

राज्यातील महत्त्वाच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले जतन, संवर्धन व व्यवस्थापनासंबंधी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला संजय जगताप, संग्राम थोपटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आणि प्राचीन कातळशिल्पे या तीन प्रकारातील संवर्धन प्रस्ताव युनेस्कोला देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या युद्ध तंत्रासंदर्भात या गडकिल्ल्यांची वैशिष्ट्ये अधोरेखित करुन जागतिक इतिहासाच्या पटावर या किल्ल्यांचे ऐतिहासिक व पुरातत्वीय महत्व युनेस्कोला पटवून देण्याचे काम राज्य पुरातत्व विभाग करीत असल्याची माहिती पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी दिली.

(हेही वाचा – मुंबईतील २ हजार ८०० राखीव सदनिकांची सोसायट्यांनी केली परस्पर विक्री?)

किल्ल्यांच्या संरक्षणाबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे मागणी केली होती. त्या अनुषंगाने देखील राजगड, तोरणा गडकिल्ल्यांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यांच्या मागणीनुसार किल्ले रायरेश्वर, रोहिडेश्वर, सोनवडी आणि दौलत मंगल हे गडकिल्ले देखिल किल्ले संवर्धन योजनेत समाविष्ट करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनास दिले आहेत. तसेच राज्यातील अन्य ५९ गडकिल्ल्यांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी सीएसआरचीही मदत

किल्ले संवर्धन योजनेतील सहा गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचीही (सीएसआर फंड) मदत घेण्याचा निर्णय झाला असून, या उपक्रमात देशभरातील विविध नामांकित उद्योजकांचे सहकार्य घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरु असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

जगभरातील वास्तुसंवर्धन व पुरातत्व तज्ज्ञांची परिषद

राज्यातील गडकिल्ल्यांच्या जतन, संवर्धनासाठी जगभरातील नामांकित वास्तुसंवर्धन तज्ज्ञ आणि पुरातत्व तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. या परिषदेत वास्तुसंवर्धन व पुरातत्व क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाबाबत माहितीचे आदानप्रदान करता येईल, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.