‘एसआरए’च्या कारभाराचा पर्दाफाश करणार, खासदार गोपाळ शेट्टी यांचा इशारा

113

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) अधिकारी आणि स्थानिक नेते-कार्यकर्ते एकमेकांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करीत आहेत. असले प्रकार अजिबात सहन केले जाणार नसून, अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांवर मनमानी केल्यास ‘एसआरए’च्या कारभाराचा पर्दाफाश करणाण्याचा इशारा भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिला आहे.

गृहनिर्माण विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. एसआरएही या विभागांतर्गत येते. या प्राधिकरणातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. दसऱ्याला सरकारी सुट्टी असतानाही प्रशांत चौगुले नावाचा दुय्यम अभियंता एका सहकाऱ्यासह मालाड येथील एसआरएच्या देवस्मृति इमारतीचे काही फ्लॅट रिकामी करण्यासाठी पोहोचला. यासंदर्भात माहिती मिळताच खासदार शेट्टीही तेथे पोहोचले. या बेकायदेशीर वसुलीमध्ये काही राजकीय पक्षांचे स्थानिक नेते सहभागी असून, एसआरए अधिकाऱ्यांच्या संगनमताने असे प्रकार सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी शेट्टी यांना दिली.

(हेही वाचा राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ, वीर सावरकरांचा अवमान, उद्धव ठाकरे निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल!)

दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी एसआरएचे दोन अधिकारी सक्रिय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला परवडणाऱ्या दरात घरे देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. मात्र खालच्या स्तरावरील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यंत्रणा पोकळ करत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही. आमच्या सरकारने झोपडपट्टीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांकडून अडीच लाख रुपये शुल्क घेऊन पात्र बनवण्याचा निर्णय घेतले आहे. शासनाच्या या निर्णयाचा जीआर लवकरच प्रसिद्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एसआरएच्या अधिकाऱ्यांनी लोकांकडून बेकायदेशीरपणे वसुली सुरू केली आहे. याच कारणामुळे दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी एसआरएचे दोन अधिकारी मालाडच्या सोसायटीत पोहोचले, अशी माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.

अखेर ‘त्या’ अधिकाऱ्याने लेखी माफी मागितली

दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी एसआरए इमारतीतील फ्लॅट रिकामा करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याने लेखी माफी मागितली आहे. हा सगळा वाद गैरसमजातून झाला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. या सर्व वादाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे दुय्यम अभियंता प्रशांत चौगुले यांनी आपल्या लेखी माफीनाम्यात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.