MNS : नवी मुंबईत मनसेच्या दोन गटांमध्ये राडा; मराठी कामगार सेना बरखास्त

319
नवी मुंबईत मनसे (MNS) आणि मनसेचीच मराठी कामगार सेना यांच्यात राडा सुरु झाला आहे. कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ते मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी शिवतीर्थ बंगल्यात भेटल्यावर गेल्यावर मारहाण केल्याचा आरोप करत राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर त्याचे पडसाद नवी मुंबईत उमटले. मनसे (MNS) आणि कामगार सेनेचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी सुरु झाली.
महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत आपल्याला मारहाण झाल्याचे म्हटले. त्यात त्यांच्या कपाळावरून ओंघळणारे रक्त दिसत आहे,  तसेच त्यांच्या चेहऱ्याला झालेली दुखापतदेखील दिसत आहे. महेश जाधव यांनी दावा केला आहे की, माथाडी संघटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या घरी गेलो होतो. तिथे मला अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. दरम्यान, या मारहाणीनंतर जाधव यांना खारघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी यावर पक्षाच्या वतीने भूमिका मांडताना म्हटले की, महेश जाधव हे बिल्डर आणि कामगारांकडून पैसे, खंडणी वसूल करायचे, त्याविषयी त्यांना अमित ठाकरे यांनी विचारणा केल्यावर महेश जाधव उलटसुलट उत्तरे देऊ लागले, त्यामुळे त्यांना मारण्यात आले, असे देशपांडे म्हणाले.

मराठी कामगार सेना बरखास्त 

दरम्यान या प्रकारानंतर मनसेने (MNS) महेश जाधव यांच्यासह मराठी कामगार सेनेवर कारवाई केली आहे. मनसेने एक परिपत्रक जारी केले. त्यात म्हटले की, सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळवण्यात येत आहे की, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. मराठी कामगार सेना या संघटनेचा आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून मनसेशी अथवा पक्षाची अंगीकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भूमिकेशी, मराठी कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचा आणि पक्षाच्या इतर अंगीकृत संघटनांचा कोणताही संबंध नसेल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.