शाश्वत धर्म कधीही बदलत नाही – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

98

व्यक्ति त्याच धर्माचे पालन करतो जो धर्म त्याच्या प्रकृतिला मानवतो. गुण आणि कर्मावरून माणसांना समान लेखत असतानाच काही त्रुटी असल्या तरी धर्मपरिवर्तन करू नका शाश्वत धर्म कधीही बदलत नसल्याचे संत रवीदास यांनी आपल्या आचरणातून अधोरेखीत केल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले. रविदास समाज पंचायत संघ आणि वसुधा चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या प्रभादेवी येथे आयोजित संत रवीदासांच्या ६४७ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी सरसंघचालक म्हणाले की, वर्तमानात आपला हिंदू समाज, धर्म वाढावा आणि आमच्या हातून जगाचे कल्याण व्हावे अशी आपली भावना आहे. आजच्या काळात आम्ही विश्व कल्याणाचे स्वप्न पाहू शकतो. परंतु, ४० वर्षांपूर्वी जर कुणी असे बोलले असते तर तो चेष्टेचा विषय ठरला असता. परंतु, गेल्या काही वर्षीत जगात भारताची प्रतिष्ठा आणि समार्थ्य वाढल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. संत रविदास यांच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, भागवतात सत्य, करुणा, मनाची पवित्रता आणि तपश्चर्या असे चार प्रमुख तत्त्व सांगितले आहेत. या चार बिंदूंच्या पलिकडे कुठलाही धर्म असू शकत नाही. उपासना पद्धतीमधील कर्मकांड म्हणजे धर्म नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संत रविदासांच्या आयुष्यातील घटना सांगताना डॉ. भागवत म्हणाले की, सिकंदर लोधी याने रविदासांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले होते. त्यावेळी रविदासांनी वेदात प्रतिपादीक धर्म श्रेष्ठ असल्याचे सांगत धर्मपरिवर्तनास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या सिकंदर लोधीने त्यांना कारागृहात डांबले होते. परंतु, स्वधर्मियांचा विरोध आणि परकियांचा जाच सहन करूनही संत रविदासांनी धर्मत्याग केला नाही. त्याचप्रमाणे संत रविदास आणि छत्रपतींनी इतर धर्मांविषयी कधी आकस ठेवला नाही. औरंगजेबाने ज्यावेळी काशी विश्वनाथ मंदिर भग्न करून हिंदूंवर अत्याचार केले त्यावेळी छत्रपतींनी त्याला पत्र पाठवून राज्यकर्त्याने धर्माच्या आधारावर प्रजेत भेदभाव करू नये अन्यथा अन्यायी शासनाच्या विरोधात तलवार उपसावी लागेल असे ठणकावल्याचे भागवत यांनी सांगितले.

(हेही वाचा – ‘अमृत काळात देशाची नवीन परिभाषा, व्यवस्थेची नवीन मांडणी निर्माण करत आहे’)

यावेळी श्रमनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित करताना सरसंघचालकांनी सांगितले की, श्रमप्रतिष्ठेचा अभाव हे देशातील बेरोजगारीचे प्रमुख कारण आहे. देशात केवळ १० टक्के आणि जगात फक्त ३० टक्क्यांहून अधिक लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. त्यामुळे श्रमनिष्ठेला महत्व देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आज, शेतकऱ्यांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होत नाही. परंतु, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आम्हाला श्रमाला महत्व द्यावे लागेल. रविदासांनी सांगितलेले समतेचे तत्त्व ओठाने मान्य करतानाच ते पोटातून आचरणात उतरले पाहिजे. तरच भारत विश्वगुरू बनून संत रविदासांचे नाव आणि तत्त्वज्ञान जगाला कळेल यासाठी आपण सर्वजण संकल्प सोडला पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.