अपघातात कारमध्ये घुसला मोठा पत्रा: जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या आजी-आजोबांच्या मदतीला धावले मुख्यमंत्र्यांचे ओएसडी डॉ. राहुल गेठे

153

मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सुसाट असलेली कार थेट रस्त्यालगतच्या लोखंडी दुभाजकावर आदळली आणि दुभाजकाचा भलामोठा पत्रा कारमध्ये घुसला. यामुळे कारमध्ये अडकलेल्या आजी-आजोबांना बाहेर पडणे कठीण झाले. त्यामुळे आजी-आजोबा जीवाच्या आकांताने मदतीसाठी आरडाओरडा करू लागले. पण मदतीसाठी कोणी थांबेना. शेवटी देवासारखे धावून आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) डॉ. राहुल गेठे. त्यांनी फोनाफोनी करून पोलिसांसह इतर यंत्रणांना मदतीस बोलावले आणि पाच मिनिटांत आजी-आजोबांना कारमधून बाहेर काढले. डॉ. गेठे यांनी आजी-आजोबांना उपचार देऊन त्यांना धीर दिला. डॉ. गेठे यांच्या तत्परतेमुळे भीषण अपघातात अडकलेल्या आजी-आजोबांसह मुलाचाही जीव वाचला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तिघांवर मोफत उपचाराचे तातडीने आदेश दिले आहेत.

शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या कारचा सोमाटणे फाट्याजवळ भीषण अपघात झाला. सुसाट असलेली ही कार थेट रस्त्यालगतच्या लोखंडी दुभाजकावर आदळली आणि दुजाकाचा भलामोठा पत्रा काचेतून आरपार मागे बसलेल्या आजी-आजोबांपर्यंत पोहोचला. यामुळे कार लॉक झाली. तसेच कारचा चालक बाहेर फेकला गेला. अपघातग्रस्त कारमधले आजी-आजोबा मदतीसाठी आरडाओरड करू लागले. पण कोणी थांबत नव्हते.

(हेही वाचा – राज्य लोककला महामंडळाबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

मुंबईहून पुण्याकडे जात असलेले डॉ. राहुल गेठे रस्त्यावर थांबले. त्यांनी सुरुवातीला आजी-आजोबांना बाहेर काढण्यासाठी स्वतः धडपड केली. पण बाहेर काढणे कठीण झाले होते. शेवटी त्यांनी फोनाफोनी करून आपत्कालीन यंत्रणा बोलावून घेतल्या. मग कारचे दरवाजे कापून आजी-आजोबांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. या भीषण अपघातामुळे खूप घाबरलेल्या आजी-आजोबांवर तिथेच डॉ. गेठेंनी उपचार केले. मग तातडीने रुग्णवाहिकेमधून तिघांना पवना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतरच डॉ. राहुल गेठे तिथून निघून गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.