शासकीय कामात अडथळा, नगरसेवकाला दोन वर्षे कारावास

108

शासकीय कामात अडथळा करीत मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी बंडू पुंडलिकराव आठवले (रा. मिलिंदनगर, चांदूर रेल्वे) याला अमरावती येथील जिल्हा न्यायाधीश क्र. ६ एस.बी. जोशी यांनी दोन वर्षे कारावास ठोठावला. सात वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे.

नेमके काय घडले?

विधी सूत्रांनुसार, २२ ऑगस्ट २०१५ रोजी नगर परिषद कार्यालयात तत्कालीन नगरसेवक बंडू आठवले, बच्चू वानरे, नगरसेविकाचे पती श्रीनिवास सूर्यवंशी हे तत्कालीन नगराध्यक्ष मंगेश खवले यांच्या कक्षात धडकले. बंडू आठवले याने आत्मदहनाचा इशारा देणारे पत्र दिले. खवले यांनी त्याचे वाचन करताच आठवले याने अर्वाच्य भाषेचा वापर करीत शिवीगाळ केली. खुर्च्यांची फेकाफेक केली तसेच ॲट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात फसविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी आठवलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी सहा साक्षीदार तपासण्यात आले.

(हेही वाचा – कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही; काँग्रेस, राष्ट्रवादीने केले स्पष्ट)

अतिरिक्त सरकारी वकील पंकज इंगळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ६ एस.बी. जोशी यांनी आरोपी बंडू आठवलेला कलम ३५३ अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड, कलम ४४८ अन्वये सहा महिने कारावास, १०० रुपये दंड व कलम ४२७ अन्वये एक महिना कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.