धनुष्यबाण आमच्या पूजेतला, तो ओरबाडून घेता येणार नाही – उद्धव ठाकरे

97

चोर हा चोरच असतो. आज मिन्द्ये गटाची जी दयनीय अवस्था झाली आहे, त्यांना स्वतः लढण्याची हिंमत नाही, निवडणूक घेण्याची त्यांची हिंमत झाली नाही, आता त्यांनी मिन्द्ये गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण दिले, त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या महिना – दोन महिन्यात जाहीर करतील, असे वाटते. पण आता मशाल पेटलेली आहे, असे सांगत धनुष्यबाण ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो घेऊ शकणार नाही. आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल नामर्द कितीही म्हटला तरी तो मर्द होऊ शकत नाही. त्यांना चोरीचे पेढे खाऊ द्या, आम्ही सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, शिवसैनिकांनो खचून जाऊ नका, हिंमत सोडू नका, लढाई शेवटपर्यंत लढायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांना दिल्याचा निर्णय दिल्यानंतर त्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. धनुष्यबाण आजही माझ्याकडे आणि ते कायमचे माझ्याकडेच राहणार आहे. शिवसेना अशी लेचीपेची नाही ती संपणार नाही. धनुष्यबाण आमच्या पूजेतील आहे तो पूजेतच राहणार, धनुष्यबाण रावणाकडेही होता आणि श्री रामाकडेही होता पण विजय सत्याचाच झाला. अनेकांना हा अन्याय मान्य नाही, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे धृतराष्ट्राप्रमाणे गप्प बसणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ आणि १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषयही प्रलंबित आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा शिवसेना एकनाथ शिदेंचीच; काय म्हणाले निवडणूक आयोग?)

आजचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाले आहेत आणि बेबंदशाहीला सुरुवात केली आहे हे आता पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहीर करावे. न्याय यंत्रणा दबावाखाली आली आहे. असेच सुरु असेल तर लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली देऊन बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत हे मोदींनी सांगावे. सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे, मधल्या काळात तो निकाल जोवर लागत नाही तोवर निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये असे आम्ही म्हटले होते. जर निवडून येणाऱ्या आमदार आणि खासदारांच्या जोरावत कुणी पक्ष ताब्यात घेणार असेल, तर कोणीही धनाढ्य माणूस खासदार विकत घेऊन देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती होईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.