निर्बंधांची हंडी फोडणा-या मनसैनिकांवर कारवाई… नांदगांवकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बंधनांना न जुमानता मनसैनिकांनी मुंबई, ठाणे येथे दहीहंडी फोडत गोपाळकाला साजरा केला.

115

गोपाळकाला साजरा करण्यासाठी मनसेने राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांची हंडी फोडून जे सांगितले ते करुन दाखवले. मुंबईसह ठाण्यात दहीहंडी फोडत मनसेने मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला. त्यामुळे नियम झुगारुन उत्सव साजरा करणा-या मनसे सैनिक आणि नेत्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. मनसे नेते बाळा नांदगांवकर यांच्यासह अनेक मनसेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि तिस-या लाटेचे संभाव्य संकट टाळण्यासाठी राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंधने घातली होती. पण या बंधनांना न जुमानता मनसैनिकांनी मुंबई, ठाणे येथे दहीहंडी फोडत गोपाळकाला साजरा केला.

(हेही वाचाः अखेर मनसेने दहीहंडी फोडलीच! कधी आणि कशी?)

नांदगांवकरांनी फोडली हंडी

संदीप देशपांडे, बाळा नांदगांवकर, अविनाश जाधव या मनसेच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सव साजरा होणारच, असे सांगितले होते. त्यानुसार मानखुर्द, दादर येथे पहाटेपासून दहीहंडी फोडत मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्यात आला. बाळा नांदगांवकर यांनी काळाचौकी मैदानात हजेरी लावली. त्यावेळी दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आम्हाला आमचे उत्सव साजरे करू द्या नाहीतर आम्ही आंदोलन करू, असा सरकारला इशारा देणा-या बाळा नांदगांवकर यांनी काळाचौकी येथील दहीहंडी फोडली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

‘या’ ठिकाणी फोडली हंडी!

मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मोठा स्टेज उभारला होता. मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मनसे नेत्यांनाही नोटीस पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मनसे पुढे काय करणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर ३० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा मनसेने दहीहंडी फोडलीच. यावेळी ठाणे येथील मनसेच्या कार्यालयासमोर महिला कार्यकर्त्यांनी दहहंडी फोडली, तसेच ठाण्यातील वर्तक नगर येथेही मनसेच्या विद्यार्थी सेनेने दहीहंडी फोडली. तर वरळी नाका, घाटकोपर येथील भटवाडी, मानखुर्द, मुलुंड, नाशिक येथेही मनसेच्या वतीने दहीहंडी फोडून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

(हेही वाचाः फेरीवाल्याने छाटली अधिकारी महिलेची बोटे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.