महाराष्ट्राची संस्कृती एक कोटी कोहिनूर हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

जेएनयु येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यासन केंद्र उभारण्याबाबतही चर्चा

128
महाराष्ट्राची संस्कृती एक कोटी कोहिनूर हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मराठी भाषिक केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश-विदेशात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे व राज्याच्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करत आहे. आवश्यकता असेल तिथे एकत्रित येऊन सामूहिक योगदानातून आपल्या सांस्कृतिक कार्याचे संरक्षण करत इतर समाजापर्यंत, भाषिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही एक कोटी कोहिनूर हिऱ्यांपेक्षाही मौल्यवान असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

राजधानी स्थित महाराष्ट्र सदनच्या बॅंक्वेट हॉल येथे महाराष्ट्र सांस्कृतिक धोरण पुर्नविलोकन समितीची बैठक सांस्कृतिक कार्य संचालनालयाव्दारे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक धोरण पुर्नविलोकन समितीचे अध्यक्ष व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक विभिषण चावरे तसेच समितीचे अशासकीय सदस्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, नवीन सांस्कृतिक धोरण तयार करताना कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येईल. विविध १० समित्यांचे प्रमुख व त्यांचे सदस्य सांस्कृतिक कार्यक्षेत्रात येणाऱ्या क्षेत्रांचा अभ्यास करून एक सर्वंकष धोरण निर्माण करत आहे. मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक हा महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक वर्षांपासून राहत असून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करीत आहे. आवश्यकता असेल तिथे एकत्रित येऊन सामूहिक योगदानातून आपल्या सांस्कृतिक कार्याचे संरक्षण करत, त्यागत इतर समाजापर्यंत, भाषिकांपर्यंत अहत तंजावर ते तहत पेशावर पर्यंत संस्कृती पोहोचवण्याचा कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – आता ‘या’ कारणाने तांदूळ होणार जगभरात महाग)

नव्याने तयार करण्यात येणारे सांस्कृतिक धोरण परिपूर्ण व सर्वंकष होण्यासाठी कारागिरी, मराठी भाषा/साहित्य/ वाचन संस्कृती/ग्रंथव्यवहार, दृष्यकला, गडकिल्ले व पुरातत्व, लोककला, संगीत, रंगभूमी, नृत्य, चित्रपट व भक्ती संस्कृती समिती अशा दहा वेगवेगळ्या विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सांस्कृतिक दृष्ट्या या महत्वपुर्ण विषयांचे कार्य व्यापक व परिणामकारक होण्यासाठी या समितीद्वारे त्या क्षेत्रांत येणा-या अडचणी, लोकपावत चाललेल्या रूढी, परंपरा, संस्कृती यांची सद्याची परिस्थिती व यावर सुचवायच्या उपाययोजना याबाबत सर्व उपस्थित समितीतील अशासकीय सदस्यांनी यावेळी सादरीकरण केले.

जेएनयु येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यासन केंद्र उभारण्याबाबत चर्चा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने असो किंवा मराठी भाषेच्या निमित्ताने असो, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यासन केंद्र व्हावं, यासाठी सांस्कृतिक मंत्री यांनी विद्यापीठाच्या कुलपति, श्रीमती शांतीश्री पंडित यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

राजधानीतील विविध मराठी मंडळांसोबत धोरणाबाबत चर्चा

सांस्कृतिक मंत्री यांनी राजधानीतील विविध मराठी मंडळांसोबत धोरणाविषयी चर्चा केली व त्यांचे विचार जाणून घेतले. काही विशिष्ट योजनांच्या माध्यमातून मराठी पराक्रम, मराठी वारसा देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचावा या हेतूने प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीस्थित बृहणमहाराष्ट्र मंडळ, दिल्ली मराठी प्रतिष्ठान आदि मंडळांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते. राज्याचे नवीन प्रस्तावित सांस्कृतिक धोरण सर्वंकष असेल आणि इतर राज्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे अनुकरण करतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला तसेच या धोरणातून एक आनंद लोकांपर्यंत पोहोचवता यावा या दृष्टीने आज विस्तृत चर्चा झाली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.