Lok Sabha Election 2024 : बारामतीसाठी देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई; हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीसाठी मदत घेणाऱ्या अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत नेहमीच विरोधाची भूमिका घेतली, अशी तक्रार पाटील यांनी फडणवीस यांनी केल्याचे समजते.

162
Lok Sabha Election 2024 : बारामतीसाठी देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई; हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात मुसंडी मारण्यासाठी भाजपाने शर्थीचे प्रयत्न चालवले असून अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी फडणवीस यांनी आज इंदापूर तालुक्यातील नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बुधवारी (२० मार्च) सागर या आपल्या शासकीय निवासस्थानी पाचारण केले. यावेळी त्यांनी पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

महायुतीत बारामती हा लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार आहे. अजित पवार गटाने येथून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित केल्याने त्यांचा सामना शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याशी होणार आहे. मात्र, आपले जुने राजकीय हिशोब चुकविण्यासाठी अजित पवारांच्या विरोधकांनी उचल खाल्ली आहे. पुरंदरमधील विजय शिवतारे यांच्या पाठोपाठ इंदापूर तालुक्यातील अजित पवार यांचे राजकीय विरोधक हर्षवर्धन पाटील यांचा गटही विरोधाच्या भूमिकेत आहे. (Lok Sabha Election 2024)

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज हर्षवर्धन पाटील यांना आपल्या सागर या शासकीय निवासस्थानी चर्चेसाठी बोलावून घेतले. यावेळी पाटील यांनी गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याकडून झालेल्या त्रासाची माहिती दिली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पराभूत झाल्यानंतरही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शब्द देऊनही इंदापूरची जागा तेव्हा काँग्रेससाठी सोडली नाही. त्यामुळे २०१९ ची विधानसभा निवडणूक आपल्याला भाजपच्या चिन्हावर लढावी लागली.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक सर्वाधिक खर्चिक; किती होणार खर्च, जाणून घ्या…)

राज ठाकरेंच्या भेटीबद्दल एक-दोन दिवसांत बोलु – फडणवीस

लोकसभा निवडणुकीसाठी मदत घेणाऱ्या अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत नेहमीच विरोधाची भूमिका घेतली, अशी तक्रार पाटील यांनी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्याचे समजते. यावेळी फडणवीस यांनी पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतले. लोकसभा निवडणुकीतील महायुतीचा उमेदवार आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपले नेते नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे बारामतीत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करा, अशी सूचना फडणवीस यांनी पाटील यांना केल्याचे समजते. (Lok Sabha Election 2024)

दरम्यान, आम्हाला महायुतीला मजबूत करायचे आहे. तसेच नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे जे थोडेफार मतभेद आहेत ते दूर केले जात आहेत. त्यानुसार आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीबद्दल प्रश्न केला असता, काल त्यांची भेट झाली. त्यामुळे यावर लगेच काही बोलण्यापेक्षा एक-दोन दिवस वाट पहा. त्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू, असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. दरम्यान, आजच्या भेटीत आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. स्थानिक पातळीवरील विषयांसंदर्भात चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली. आमच्या विषयाच्या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते योग्य मार्ग काढतील, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.