Baramati Lok sabha constituency : शिवतारेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट; थोपटे म्हणाले, अजून भूमिका घेतली नाही; दोन्ही पवारांची धाकधुकी वाढली…

बारामती मतदारसंघात खासदार बारामती शहाराचाच का असावा, तो भोर, पुरंदर, इंदापूर या भागातला का नसावा? शरद पवारांनी केवळ बारामती शहराचाच विकास केला, पश्चिम बारामती दुष्काळात आहे. त्या भागाचा विकास झाला नाही. मी त्या भागाच्या विकासासाठी निवडणूक लढवणार आहे, असे विजय शिवतारे म्हणाले.

252
लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच देशभरात वातावरण चांगलेच गरम झाले, तसे वातावरण महाराष्ट्रातही झाले आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok sabha constituency) होणारी निवडणूक खूपच चर्चेत आली आहे. कारण या ठिकाणी शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवार देणार आहे. तेव्हापासून शरद पवार बेरजेचे राजकारण करू लागले आहेत  त्यांनी आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन २० वर्षांचे वैर संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजित पवार यांनी थोपटे यांच्या साखर कारखान्याला १०० कोटींची मदत देऊ केली. आता बुधवार, २० मार्चला बारामतीमध्ये (Baramati Lok sabha constituency) पवार कुटुंबाच्या दोन्ही उमेदवारांना शह देण्याचा निश्चय केलेले विजयबापू शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. या सगळ्या घडामोडीनंतर स्वतः अनंतराव थोपटे यांनी ‘आपण अजून भूमिका ठरवली नाही’, असे म्हटले आहे.

काय म्हणाले अनंतराव थोपटे? 

विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतल्यावर माध्यमांनी थोपटे यांना बोलते केले, त्यावेळी थोपटे म्हणाले, आमचे आणि शरद पवारांचे जुन्या काळापासून मतभेद आहेत. त्यांच्यामुळे आपला पराभव झाला होता, पण आता शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली आहे. ते मला भेटायला आले होते, त्यावेळी जुन्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांची मुलगी सुप्रिया निवडणुकीला उभी राहत आहे. तिच्या विरोधात अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहे. आता विजय शिवतारेही याच ठिकाणाहून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कुणाला पाठींबा द्यायचा, यावर मी अजून तरी भूमिका घेतली नाही, पुढे बघू, पण विजय शिवतारे यांना आशीर्वाद आहेत, असे अनंतराव थोपटे म्हणाले.

काय म्हणाले शिवतारे? 

अनंतराव थोपटे यांच्याशी आपला कायम संपर्क आहे. वारंवार आपण त्यांना भेटत असतो, शरद पवारांना आता अनंतरावांची आठवण झाली, ज्यांनी आधीपासून त्यांच्याशी वैर केले. मी बारामतीत लोकसभा (Baramati Lok sabha constituency) निवडणूक लढवावी ही जनतेची इच्छा आहे. कारण बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात ५ लाख मते पडली आहेत याचा अर्थ बारामतीत ५ लाख मते पवारविरोधी आहेत. मग त्या ५ लाख मतदारांना पर्याय देण्याची जबाबदारी माझी आहे. या मतदारसंघात खासदार बारामतीचाच का असावा, तो भोर, पुरंदर, इंदापूर या भागातला का नसावा? शरद पवारांनी केवळ बारामती शहराचाच विकास केला, पश्चिम बारामती दुष्काळात आहे. त्या भागाचा विकास झाला नाही. मी त्या भागाच्या विकासासाठी निवडणूक लढवणार आहे, असे विजय शिवतारे म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार? 

आम्ही सुद्धा आरेला कारे करू शकतो. मात्र, वातावरण आम्हाला खराब करायचे नाही. साथ देतील त्यांना सोबत घेऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी आणि देवेंद्र फडणवीस बैठक घेणार असून बैठकीमध्ये बसून मार्ग काढू. शिवतारे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी समजावले आहे. त्यामुळे वरिष्ठांचे ऐकायचे की नाही? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी मी कोणत्याही प्रकारे बांधिल नाही. एक-दोन दिवसात शिंदेंसोबत बैठक होणार असून महायुतीमधील वातावरण खराब होईल असे काही बोलू इच्छित नाही, असे अजित पवार म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.